(रत्नागिरी)
महाराष्ट्र शासनाचे पर्यटन संचालनालय, मुंबईतील विवेक व्यासपीठ, पतितपावन मंदिर आणि श्री भागोजीशेठ कीर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीमध्ये स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर विचार जागरण सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वीर सावरकरांच्या १४० व्या जयंतीनिमित्त याचे आयोजन महाराष्ट्रात पाच ठिकाण करण्यात आले असून यात रत्नागिरी, नाशिक, पुणे, सांगली व मुंबई या ठिकाणांचा समावेश आहे. रविवार दि. २१ मे ते २८ मे या कालावधीत स्वा. सावरकरांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या कार्यक्रमांची रचना करण्यात आली आहे.
पतितपावन मंदिरात आयोजित पत्रकार परिषदेत यासंबंधीची विस्तृत माहिती देण्यात आली. या वेळी पतितपावन मंदिर संस्थेचे अध्यक्ष उन्मेश शिंदे, अॅड. बाबासाहेब परुळेकर, श्री भागोजीशेठ कीर ट्रस्टचे ट्रस्टी अॅड. विनय आंबुलकर, समन्वयक रवींद्र भोवड आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाने वीरभूमी परिक्रमेअंतर्गत याचे नियोजन केले आहे. रत्नागिरी शहरात वक्तृत्व, रांगोळी स्पर्धा, पथनाट्ये, वाळूशिल्प यांसह विनायका रे हा संगीतमय कार्यक्रम, शोभायात्रा आणि सहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहाची सुरवात २१ मे रोजी सकाळी ९ वाजता स्वा. सावरकर चौक ते हनुमान मंदिर, शिरगाव येथपर्यंत बाईक रॅलीने करण्यात येणार आहे. याच दिवशी सायंकाळी ७ वाजता स्वा. सावरकर नाट्यगृहामध्ये त्या तिघी (स्वातंत्र्यकुंडातील अज्ञात समिधा) हे सावरकर कुटुंबातील महिलांच्या त्यागाचे मूर्तीमंत प्रतिक दाखवणारे नाट्य सादर होईल. पुण्यातील अभिव्यक्त संस्थेतर्फे याचे सादरीकरण होणार आहे.
२२ मे रोजी सकाळी ११ वाजता रांगोळी स्पर्धा सुरू होईल. वीर सावरकरांच्या जीवनावरील या रांगोळ्यांचे प्रदर्शन पतितपावन मंदिरात सायंकाळी ६ वाजल्यापासून सुरू होईल. हे प्रदर्शन पुढे आठवडाभर सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. २३ मे रोजी सकाळी ११ वाजता आठवडा बाजार व नंतर स्वा. सावरकर चौक येथे देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी वीर सावरकरांवर आधारित पथनाट्य सादर करतील. २४ मे रोजी सकाळी ११ वाजता विठ्ठल मंदिर येथे वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेला जिल्ह्यातील अनेक स्पर्धक सहभागी होणार आहेत.
गुरुवारी २५ मे रोजी सकाळी रेल्वेस्टेशन आणि मारुती मंदिर चौक येथे वीर सावरकरांच्या जीवनावरील पथनाट्य सादर केले जाणार आहे. याच दिवशी सायंकाळी ६.३० वाजता राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्त आफळेबुवा यांचे कीर्तन साळवी स्टॉप- नाचणे लिंक रोड येथील ओम साई मित्रमंडळाच्या हॉलमध्ये होणार आहे. स्वा. सावरकरांचे हिंदुत्वाचे विचार यावर कीर्तनकार आफळे बुवा विवेचन करणार आहेत. २६ मे रोजी रत्नागिरीतील शिल्पकार अमित पेडणेकर हे भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर वीर सावरकरांचे अनोखे वाळूशिल्प साकारणार आहेत. सायंकाळी ६ वाजता त्याचे अनावरण करण्यात येणार आहे.
२७ मे रोजी स्वा. सावरकरांच्या गीते, कवितांवर आधारित ‘विनायका रे…’ हा संगीतमय कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता स्वा. सावरकर नाट्यगृहात (वातानुकूलित) रंगणार आहे. लिटिल चॅंपफेम आणि आरवली (जि. रत्नागिरी) सुपुत्र गायक प्रथमेश लघाटे व आघाडीची गायिका मुग्धा वैशंपायन हे दोघेही कलाकार वीर सावरकरांची गीते सुरेल आवाजात सादर करणार आहेत.
वीर सावरकरांची १४० वी जयंती येत्या २८ मे रोजी आहे. सावरकर विचार जागरण सप्ताहाची सांगता या दिवशी शोभायात्रा व सहभोजनाने होणार आहे. या दिवशी सकाळी ९ वाजता मध्यवर्ती कारागृह येथील स्वा. सावरकर स्मारक येथून जयस्तंभ, एसटी स्टॅंड, राम आळी, गोखले नाका, गाडीतळ मार्गे पतितपावन मंदिर येथे शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यामध्ये विविध संस्थांचे चित्ररथ सहभागी होतील. हिंदुत्ववादी संस्थांसह मंदिर संस्था, ज्ञाती संस्थाही यात सहभागी होणार आहे. शोभायात्रा पतितपावन मंदिरात पोहोचल्यानंतर ११.३० वाजता सहभोजनाचा कार्यक्रम सुरू होईल.
या सर्व कार्यक्रमांना रत्नागिरीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पर्यटन संचालनालय, पतितपावन मंदिर संस्था, श्री भागोजीशेठ कीर ट्रस्ट आणि विवेक व्यासपीठ यांच्यावतीने करण्यात येत आहे.