(मुंबई)
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३९व्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे शौर्य, विज्ञान आणि स्मृतीचिन्ह पुरस्कार तसेच शिखर सावरकर पुरस्कार २०२१ चा वितरण समारंभ रविवार, २२ मे २०२२ या दिवशी सायंकाळी ७ वाजता आयोजित केला आहे. यावेळी स्मारकाने तयार केलेला समाजक्रांतिकारक सावरकर या लघुपटाचे लोकार्पणही करण्यात येणार आहे. या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अतुल भातखळकर हे उपस्थित राहाणार आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, वीर सावरकर मार्ग, छत्रपति शिवाजी महाराज उद्यान, दादर (प.) मुंबई येथे हा समारंभ होणार आहे. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने देण्यात येणारा शौर्य पुरस्कार (एक लाख एक एकावन्न हजार रुपये आणि मानचिन्ह- मानपत्र) कीर्तिचक्र विजेते नायब सुभेदार संतोष राळे यांना तर विज्ञान पुरस्कार (एकावन्न हजार रुपये आणि मानचिन्ह- मानपत्र) डी.आर डी ओ. चे संचालक अतुल राणे आणि स्मृतीचिन्ह पुरस्कार (पंचवीस हजार रुपये आणि मानचिन्ह- मानपत्र) बडोदरा येथील वीर सावरकर स्मृती केंद्र यांना प्रदान करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे कोरोनामुळे प्रलंबित झालेला शिखर सावरकर पुरस्कार २०२१ हा देखील यावेळी देण्यात येणार आहे. या पुरस्काराच्या अंतर्गत शिखर सावरकर जीवनगौरव पुरस्कार एव्हरेस्ट वीर पद्मश्री सोनम वांग्याल, शिखर सावरकर युवा पुरस्कार सुशांत अणवेकर, मुंबई यांना तर शिखर सावरकर उत्कृष्ट गिर्यारोहण संस्था पुरस्कार रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स, रत्नागिरी यांना प्रदान करण्यात येईल. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित, कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्षा मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर आणि सहकार्यवाह स्वप्निल सावरकर यांनी या संबंधात ही माहिती दिली.