(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत खून प्रकरणातील तिसऱ्या संशयिताने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र गंभीर स्वरुपाचा गुन्हा असल्याने आज न्यायालयाने तिसऱ्या संशयिताचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
माजी सभापती स्वप्नाली सावंत 31 ऑगस्ट 2022 पासून बेपत्ता झाल्याचा बनाव तिचा पती सुकांत उर्फ भाई सावंत यांनी केला होता. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात खबरही दिली होती. पोलिस तपासात 1 सप्टेंबरला मिऱ्या येथील घरामध्ये स्वप्नालीचा पती सुकांत सावंत व अन्य दोघांनी गळा आवळून तिचा खून केला होता तसे मुख्य संशयित भाई सावंत याने पोलीस ठाण्यात कबुलही केले होते. मात्र या गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून त्याची राख आणि हाडे समुद्रात फेकल्याचे समोर आले होते.
पोलिसांनी स्वप्नालीचा पती सुकांत उर्फ भाई सावंत, रुपेश उर्फ छोटा भाई कमलाकर सावंत व प्रमोद उर्फ पम्या बाळू गावणंग (सर्व रा. सडामिऱ्या, रत्नागिरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तिघांनाही अटक करुन दोषारोपत्र न्यायालयात दाखल केले. या गंभीर गुन्ह्यातील संशयितांन न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.
दरम्यान या प्रकरणातील तिसरा संशयित प्रमोद उर्फ पम्या बाळू गावणंग (रा. सडामिऱ्या, रत्नागिरी) यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. आज सोमवारी (ता. 25) न्यायालयात या जामिन अर्जावर सुनावणी झाली. आरोपी व सरकारी पक्षातर्फे युक्तीवाद झाला. सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता अॅड. प्रफुल्ल साळवी यांनी युक्तीवाद केला. अॅड. साळवी यांनी आरोपीतर्फे झालेला युक्तीवाद खोडून काढला. अखेर न्यायालयाने जामीन अर्जावर निकाल देताना या गंभीर गुन्ह्यातील साक्षीदार अल्पवयीन आहेत त्यामुळे केसवर याचा परिणाम होऊ शकतो. तसेच मिळालेल्या मोबाईलची सीडीआर हा सरकारच्याबाजूने आहे त्यामुळे घटनाक्रम दिसून येतो. या कारणास्तव न्यायालयाने स्वप्नाली सावंत खून प्रकरणातील तिसरा संशयित प्रमोद गावणंग याचा जामीन अर्ज फेटाळला.