(रत्नागिरी)
स्वप्नाली सावंत खून प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. संशयित मुख्य आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी वापरलेला मोबाईल जप्त करण्यात पोलिसांना एक वर्षानंतर यश आले आहे. एका निनावी पत्राने याचा उलगडा झाला आहे.
या गुन्ह्यात जप्त केलेल्या गाडीच्या सनरुफच्या कप्प्यात हा मोबाईल सापडला. याचे कॉल तपासून कोणी खुनाच्या गुन्ह्यात सामील असल्याचे निष्पन्न झाल्यास पुरवणी दोषारोपपत्र सादर केले जाणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. या खूनप्रकरणी एक एक माहिती पोलिसांच्या पथ्यावर पडत आहे. या आधी घराजवळून जप्त केलेल्या मानवी अवशेषांचा डीएनए अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मांस आणि दाताचा डीएनए जुळला असल्याने तो मृतदेह स्वप्नाली सावंत यांचाच असल्याचे अहवालात स्पष्ट झाले होते.
दरम्यान स्वप्नाली यांचा मोबाईल पोलिसांना सापडत नव्हता. त्यानंतर पोलिस या मोबाईलचा शोध घेत होते. नंतर तो पोलिसांना विहिरीत सापडला होता; मात्र त्यातून अपेक्षित काही मिळू शकले नाही. परंतु एका निनावी पत्राने पोलिसांचे हे काम सोपे केले. हा मोबाईल भाई सावंत यांच्या गाडीच्या सनरुफच्या कप्प्यामध्ये असल्याचे पत्रात म्हटले होते. पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता, तो मोबाईल पोलिसांना सापडला आहे. या मोबाईलमधील सीम पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याचा सीडीआर काढला जाणार आहे. यातून घटनेच्या दरम्यान ज्यांचे ज्यांचे कॉल झाले आहेत किंवा आले आहेत, त्यांची चौकशी केली जाणार आहे. खुनाच्या गुन्ह्यात त्यापैकी कोण सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले, तर त्यालाही आरोपी करून पुरवणी दोषारोपपत्र दिले जाणार आहे.