(कोल्हापूर)
आदमापूर येथील संत बाळूमामा मंदिर परिसरातून अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलाची पोलिसांनी केवळ ४८ तासात सुटका करून आरोपी दाम्पत्याला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींनी सहा वर्षीय मुलाचे अपहरण केले होते. मोहन आंबादास शितोळे (वय ५०) आणि छाया मोहन शितोळे (वय ३०, दोघे रा. जवळा, ता. सांगोला, जि. सोलापूर) अशी आरोपींची नावे असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. मूल होत नसल्याच्या कारणातून दाम्पत्याने सहा वर्षीय मुलाचे अपहरण केल्याची माहिती आरोपींनी दिली आहे. सहा वर्षाच्या बालकाचे अपहरण करणाऱ्या दाम्पत्यास कोल्हापूर पोलिसांनी दोन दिवसात अटक केली. बालकाला त्याच्या पालकांकडे सोपवण्यात आले आहे.
सुषमा राहुल नाईकनवरे (रा. सातारा) या आदमापूर येथील बाळूमामा मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. ४ मार्च रोजी त्या आंघोळीसाठी गेल्या असताना सकाळी साडे आठच्या सुमारास त्यांच्या सहा वर्षाच्या मुलाला अनोळखी स्त्री व पुरुषाने मोटारसायकलीवरून पळवून नेले. याचा गुन्हा भुदरगड पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाला होता.
बालकाच्या अपहरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. आदमापूर येथील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून संशयितांचा माग काढण्यात आला. संशयित दाम्पत्य मुलाला घेऊन निपाणी, चिक्कोडी, अंकली, मायाक्का चिंचणी मार्गे मिरजकडे गेल्याचे तपासात लक्षात आले. त्यावरून पोलीस सोलापूर जिल्ह्यातील जावळा येथील मोहन शितोळे या संशयिताच्या घरी पोहोचले. मुलाची सुखरूप सुटका करून पोलिसांनी शितोळे दाम्पत्याला अटक केली. स्वत:ला मूल होत नसल्यानेच मंदिराच्या भक्त निवासातून मुलाला सोबत आणल्याची कबुली संशयित शितोळे दाम्पत्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.