(मुंबई)
स्वतःच्या क्यूआर कोडचा वापर करुन कंपनीच्या सुमारे ४८ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी एका वेलनेस सेंटरच्या मॅनेजरविरुद्ध सहार पोलिसांनी गुन्हा नोंदविलाय. अंधेरी परिसरात ही घटना घडली असून याप्रकरणी सहार पोलीस अधिक तपास करत आहेत. गुरदिपसिंग रघुवीरसिंग मठरु असं या मॅनेजरचे नाव असून तो डोबिवलीच्या शास्त्रीनगरमधील रहिवाशी आहे. गुरदिपसिंगनं गेल्या एका वर्षात ही फसवणुक केल्याचं पोलीस तपासात उघडकीस आल आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ जिवाया वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं वेलनेस सेंटरसह स्पा सर्व्हिस सेंटर आहे. या स्पा सर्व्हिस सेंटरमध्ये जून २०२१ पासून गुरदिपसिंग मॅनेजर म्हणून काम करत होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली दहा जणांची एक टिमही तिथं कार्यरत होती. जुलै महिन्यात जिवाया वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे हेड निर्मल चौधरींना फोन करुन त्यांच्या या स्पा सर्व्हिस सेंटरचा मॅनेजर गुरदिपसिंग हा ग्राहकांकडून मिळणारं पेमेंट काऊंटरमधील कंपनीच्या क्यूआर कोडवर न घेता स्वतःच्या क्यूआर कोडवर घेत असल्याचे एका अज्ञात व्यक्तीनं सांगितलं. यामुळे ग्राहकांकडून मिळणारं पेमेंट कंपनीच्या बँक खात्यात जमा न होता त्याच्या बँक खात्यात जमा होत होती. हा सर्वप्रकार निदर्शनास येताच त्यांनी याची शहानिशा सुरु केली. गेल्या एका वर्षाचं ऑडिट तपासलं असता गुरदिपसिंगने वर्षभरात कंपनीच्या सुमारे ४८ लाख रुपयांचा अपहार केल्याचं दिसून आलं.
गुरदिपसिंग हा मॅनेजर असल्यानं याबाबत त्याला कोणीही विचारणा करत नव्हतं. गेल्या काही महिन्यांपासून तो ग्राहकांचे पेमेंट आपल्या क्यूआर कोडवर घेत होता. याप्रकरणी कंपनीचे हेड निर्मल चौधरींनी गुरुदिपसिंग मठरु याच्याविरुद्ध सहार पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविलाय. या गुन्ह्यांचा तपास सूरु असून लवकरच त्याची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.