(नवी दिल्ली)
शुक्रवारी पुन्हा लोकांच्या स्मार्टफोनवर अलर्ट मेसेज आला. 23 दिवसांत तिसऱ्यांदा केंद्र सरकारने देशातील अनेक स्मार्टफोन वापरकर्त्यांना संदेश पाठवून चाचणी घेतली. यापूर्वी 17 आणि त्यानंतर 23 ऑगस्ट रोजी अनेकांना हा संदेश पाठवण्यात आला होता. पूर आणि भूकंप यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत लोकांना सतर्क करण्यासाठी ही चाचणी केली जात आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाकडून देशभरात हा संदेश पाठवला जात आहे. कॉमन अलर्टिंग प्रोटोकॉल अंतर्गत गेल्या महिन्यात 20 जुलै रोजी अनेक मोबाइल वापरकर्त्यांनाही असाच संदेश पाठवण्यात आला होता. स्मार्टफोन वापरणाऱ्यांच्या मोबाईलवर “बीप’च्या आवाजासोबत “इमरजेन्सी अलर्ट’ असा फ्लॅश मेसेज आला. त्यामध्ये लोकांना याकडे लक्ष देण्याची किंवा काळजी करण्याची गरज नाही, असे स्पष्टपणे लिहिले होते. ही संदेश चाचणी “एनडीएमए’ अर्थात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पॅन-इंडिया इमर्जन्सी ऍलर्ट सिस्टमचा एक भाग आहे, ज्याचा उद्देश सार्वजनिक सुरक्षा वाढवणे आणि आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर सूचना देणे असा आहे.
आयफोन वापरकर्त्यांना संदेश नाही
शुक्रवारी दुपारी 12.19 ते 1:06 या वेळेत वेगवेगळ्या वेळी हिंदीतून आणि एकदा इंग्रजीतून हा अलर्ट मेसेज पाठवण्यात आला. तर आयफोन वापरकर्त्यांना असा कोणताही अलर्ट मिळाल्याची माहिती नाही. ही अलर्ट सिस्टीम सध्या फक्त अँड्रॉइड युजर्ससाठीच काम करत असल्याचे समजते.