(संदेश सविता शंकर पालये)
मुलीचा गर्भ जात्याच चिवट असतो असं म्हणतात. परिस्थितीने कितीही आकांडतांडव केले तरी ती स्वतःचं अस्तित्व सिद्ध करतेच..!
याचे महत्वाचे कारण म्हणजे मुलतः निर्सगाने दिलेली नैसर्गिक शक्ती. निर्सगाने सर्व प्राणीमात्रांना जगण्यासाठी जे व्यापक स्थान निर्माण करुन दिले आहे त्यामध्ये मनुष्यप्राण्यांत स्त्रियांना प्रचंड शक्ती दिली आहे, आणि ही केवळ सहनशक्तीच नसून परिस्थितीवर मात करुन ऐतिहासिक वारसा जपण्यासाठीचीही शक्ती उपजत आहे. अन्यायाविरुद्ध केवळ आवाजच नाही तर शस्त्र धारण करुन इतिहास निर्माण करण्याची ताकद आमच्या माता-भगिनींकडे आहे. हे आम्ही रणरागिणींच्या शूर संग्रामातून वाचलं, ऐकलं, आणि अनुभवलही..! अशा शूर-वीर महिलांचे आजचे जीवन अन् स्वातंत्र्यापूर्वीचे जीवन यात खूपच बदल झालेले जाणवतात. आजचे असलेले स्वातंत्र्य, स्वमताचा अधिकार, वागण्याची,बोलण्याची व सिद्ध करण्याची संधी ही काही कोणी स्वखुशीने भेट म्हणून दिलेली नाही. या सर्वासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला आहे हे आजच्या महिला विसरत चालल्या आहेत असं प्रकर्षाने जाणवतं; काही मोजक्याच प्रमाणात याची जाणीव असलेलीही दिसते हे सत्य नाकारता येत नाही.
आज जागतिक महिला दिनानिमित्त महिलांची परिस्थिती व वस्तुस्थिती या विचारांमार्फत आपणापर्यंत पोहचवायची आहे. सुरुवातीला हा महिला दिवस का साजरा केला जातो हे समजून घेऊया आणि मग समस्त विचारमंथन..! ८ मार्च १९०८ मध्ये नूयाॅर्क येथे कापड उद्योगातील काम करणार्या महिला आणि मुलांनी स्वतःच्या हक्क आणि अधिकारांबाबत संघटित होऊन संघर्ष केला. नंतर पुन्हा ८ मार्च १९१० साली एक परिषद भरवली गेली,या परिषदेत क्लारा झेटकीन् नावाच्या जर्मनीतील कार्यकर्तीने सांगितले की हा दिन महिला दिन म्हणून साजरा करुया आणि या तिच्या सुचनेला सर्वांनी अनुमोदन दिले. यानंतर १९१४च्या दरम्यान सुरु होणार्या दुसर्या महायुद्धाची चाहूल लागताच जर्मनीतील सगळ्या महिला आणि मुलांनी युद्धभूमिविरुद्ध आंदोलन केले,अन् सरकारला ठणकावून सांगितले की युद्ध नको, आम्हाला शांतता हवी आहे ; आणि याच दरम्यान १९१७ ला पुन्हा रशियातील कामगार महिलांनी आपल्या न्याय- हक्कांसाठी आंदोलन केले. मात्र यानंतर सगळ्यांनी याची दखल घेतली. आणि ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. या दिनाचे औचित्य साधून सगळीकडेच कार्यक्रम साजरे केले जातात आणि यानिमित्ताने मला तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी घेऊन जायचे आहे की हा महिला दिनच का? पुरुष दिन का नाही ? हा सगळ्यात विचार करण्याचा मुद्दा आहे.
स्त्रीशक्तीचा जागर करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, मुलतः स्त्री-पुरुष हा भेद केवळ लिंग भेद आहे. आणि हा लिंग भेद निसर्गाने स्त्री-पुरुषांनी दिलेल्या शरीर रचनेवर आधारित आहे. परंतू कर्तृृत्वामध्ये स्त्रिया कुठेही कमी पडत नाहीत. पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना अधिक पटिने सरसपणे प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असलेल्या दिसतात. आज असे एकही क्षेत्र नाही की यामध्ये स्त्रियांचे योगदान नाही, उलट दर्जेदार पणे आपले कार्य करणार्या स्त्रिया आजही समाजात दिसतात. परंतू या स्त्रियांना तिथवर पोहचण्यासाठी संधी दिली पाहिजे ती पुरुषांनी, कुटुंबाने, समाजाने आणि पर्यायाने व्यवस्थेने..!
राष्ट्राची निम्मी संपत्ती या स्त्रिया असतात, परंतु गृहिणी म्हणून स्वतःला म्हणवणार्या स्त्रियांच्या श्रमाची गणती अनुत्पादित श्रमात गणली जाते. ती उत्पादित श्रमामध्ये गणली जात नाही. आज जागतिक स्तरावर असे मान्य केले जाते की, नोकरी करतात त्यांचे श्रम, उद्योग करतात त्यांचे श्रम उत्पादित श्रमांमध्ये मानले जातात; पण ज्या स्त्रिया २४तास घरामध्ये राबतात, कष्ट करतात आणि घराला घरपण देतात त्यांच्या श्रमाची किंमत कुठेही होत नाही. खरंतरं त्याची तुलना उत्पादित श्रमामध्ये केली गेली पाहिजे, यासाठी आता सगळी राष्ट्रे विचार करत आहेत.
आज २१व्या शतकात स्त्रिया स्वतंत्र्यपणे गगनभरारी घेऊ इच्छीतात, ते केवळ स्वातंत्र्यापूर्वीच्या स्त्रियांनी, समाजसुधारकांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे आणि प्रचंड सहन केलेल्या त्यागामुळे हे मान्य करावे लागेल. स्त्रियांकडे प्रचंड नैसर्गिक शक्ती आहे परंतु तिला स्वातंत्र्य व नवनिर्मितीसाठी संधी देणे गरजेचे आहे. हल्लीच्या स्त्रिया शिकल्या आहेत, त्यांना संधीही मिळतेय परंतु, ती चंगळवादी दुनियेच्या मानसिक गुलामगिरीत अडकत तर नाही ना याची थोडीफार भिती वाटते. आमच्या आजी-पणजीच्या काळात स्त्रियांना शिकण्याची, बोलण्याची, विचार-मत मांडण्याची, निर्णय घेण्याची संधीच नव्हती. पण आता स्त्रिया शिकल्या, सुसंस्कृत, सृजनशील झाल्या आहेत तर त्यांनी किमान तर्कशुद्ध विचार, चिकित्सात्मक चिंतन करुन चंगळवादी दुनियेतील मानसिक गुलामगिरीला व अनिष्ठ गोष्टींना प्रत्युत्तर दिले पाहिजे. स्वतःचे स्पष्ट विचार मांडले पाहिजे, ते लिखित स्वरुपात दर्शवले पाहिजे आणि या सगळ्यासाठी अभ्यासपूर्ण स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे.कारण स्त्रिया स्वतःला सुपर वूमन समजतात आणि या नादात स्वतःकडे अक्षम्य दुर्लक्ष होते ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. केवळ सौंदर्यशास्त्रापुरतेच मर्यादित न राहता वैचारिक प्रगल्भता वाढवली पाहीजे, शारिरीक व मानसिक संतुलन राखले पाहिजे, आपल्या आवडी-निवडी जोपासल्या पाहिजे, छंद-कला कौशल्यातही रस घेतला पाहिजे तसेच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकिय व प्रशासकिय पटलावर अग्रस्थानी असणे आवश्यक आहे. स्त्रियांनी आपले मुळातले अस्तित्व नाहीसे न करता देव-धर्म, पूजा-अर्चा,रुढी-परंपरा, श्रद्धा-उपासना यापेक्षाही सर्वोच्च स्थानावर पोहचण्यासाठी अथक परिश्रम घ्यावेत.
हे सर्व विचार प्रकट करताना ऐतिहासिक घडामोडी व तथाकथित घटनांचा मागोवा घेताना हे लक्षात येते की स्त्रियांना त्या काळातही संघर्ष करावा लागला. प्राचिन आणि अतिप्राचिन काळाची जडणघडण समजून घेताना तेव्हाही स्त्रियांचे स्वातंत्र्य बंदिस्त करण्याचे काम तत्कालीन व्यवस्थेने केले होते. वेद काळाच्या व्यवस्थेत प्रारंभी का होईना स्त्रियांना मानाचे स्थान होते पण नंतर मात्र ते खालावत गेले. वेद काळ हा पुढारलेला होता. थोड्यापार प्रमाणातल्या सोईमध्ये स्त्रीयांना ‘ब्रह्मवाद’ म्हणजे अविवाहीत राहुन ज्ञान देण्याची परवानगी होती. ‘सभ्यवधु’ म्हणजे लग्न करुन संसार करण्याची मुभा होती. तसेच विवाह प्रसंगी वर निवडण्याची म्हणजेच ‘स्वयंवर’ पद्धत होती हे रामायण महाभारतात पाहिले. इतिहासाचे गाढे अभ्यासक डाॅ. आ. ह. साळुंखे म्हणतात की,” वैदिक काळात स्त्रियांना मानाचे स्थान होते पण कोणत्या की,ज्या उच्चवर्णिय होत्या, राजघराण्यातील होत्या त्यांना; मात्र सामान्य स्त्रियांबद्दल कुठेही लिहलेले आढळत नाही. आणि विशेष म्हणजे तत्कालीन साहित्यामध्येही स्त्रियांबद्दल फार काही चांगले लिहलेले आढळत नाही किंवा मला सुलक्षणी,पराक्रमी आणि चांगली मुलगी व्हावी अशी कुठेही प्रार्थनाही ऐकिवात नाही, उलटपक्षी अशी प्रार्थना आहे की, ‘पुत्र व्हावा ऐसा हुंडा,ज्याचा तिन्ही लोकी झेंडा’ असं पुत्राबद्दलच लिहलेलं जाणवतं.” मुलगी हि अवांचित आपत्य समजले जात होते, म्हणजेच त्या काळी ही मुलगाच हवा होता.
थोडक्यात त्याही काळी स्त्रियांबद्दल पाहायचा दृष्टीकोन हा दुय्यमच होता. अगदी महाभारत कालखंडातील असणार्या स्त्रिया त्यापैकी द्रौपदी, माधवी, दमयंती, सावित्री, शकुंतला, अंबा, सुकन्या, रेणुका, देवयानी, सत्यवती, गांधारी, हिडिंबा या तर राजघराण्यातील होत्या. यांच्या बाबतीत फार काही विशेष नाही घडले. तर पुढे जाऊन सामान्य स्त्रियांचे काय हा प्रश्न पडतो. एकुणच पाहता व्यवस्थेच्या बंदिस्त चौकटित स्त्रियांच्या स्वातंत्र्यासह सर्वस्वालाही सुरुंग लावण्याचे काम तत्कालीन परिस्थितीत झाल्याचे दिसून येते.
पुढे जाऊन मनुस्मृति चा काळ येतो आणि यात सुरुवातीला स्त्रियांबद्दल चांगले लिहले गेले, त्यात म्हणतात की,
“यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ”
म्हणजे ज्या ठिकाणी स्त्रियांची पूजा केली जाते तेथे देवता रममाण होतात ;
आणि पुढे जाऊन याच मनस्मृतित म्हणतात की,
“पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने । रक्षन्ति स्थविरे पुत्रा न स्त्री स्वातन्त्र्यं अर्हति । ”
म्हणजे कुमारी अवस्थेत पिता रक्षण करतो, विवाहित झाल्यावर पती रक्षण करतो आणि म्हातारपणी पुत्र रक्षण करतो. मग अशा स्त्री ला स्वातंत्र्याची गरज काय? म्हणून मग पुढे जाऊन केवळ ‘चुल आणि मुल’ म्हणजेच घराच्या चुलीच्या खणापुरतीच मर्यादा आल्या आणि परकीय आक्रमणांच्या लुटमारीतुन बचावासाठी ‘पडदा पद्धत’ ,विधवा स्त्रियांकडे वाईट नजरेने बघू नये म्हणून तिला विद्रुप करण्यासाठी ‘केशवपन’ अशा अनेक प्रकारची बंधने घालण्यात आली. मला याठिकाणी हेच सांगायचे आहे की, इतकी सारी बंधने येऊन ही याच स्त्रियांनी आकाशाला गवसणी घातलीच. स्त्रिया शिकल्या पाहिजे म्हणून महात्मा फुलेंनी भिडेवाड्यात सन १८४८ ला पहिली मुलींसाठी शाळा सुरु केली. एक स्त्री शिकली तर स्वतःसह कुटुंबाचा आणि राष्ट्राचा विकास करते. पहिली मुख्याध्यापिका सावित्रीमाई फुले, शिक्षिका फातिमा शेख, पहिली डाॅक्टर आनंदी गोपाळ जोशी, पहिली अंतराळवीर कल्पना चावला, पहिली वैमानिक प्रेम माथूर आणि सरला ठकराल,पहिली रेल्वे चालक सुरेखा यादव-भोसले, पहिली राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील,पहिली आय.पी.एस. अधिकारी डाॅ.किरण बेदी, पहिली पंतप्रधान इंदिरा गांधी, पहिली राज्यपाल सरोजिनी नायडू, पहिली मुख्यमंत्री सुचेता कृपलानी, नोबेल पारितोषिकाच्या पहिल्या महिला मानकरी मदर तेरेसा, अंटार्टिकाला जाणाऱ्या पहिल्या अदिती पंत, सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बेवी, ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली महिला खेळाडू सायना नेहवाल, वर्ल्डकप शुटिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली महिला हिना सिद्धू; अशा कितीतरी क्षेत्रात आपलं अस्तित्व पहिल्या स्थानावर कोरणार्या याच भारतीय स्त्रिया कि ज्यांना समस्त भारतवासीयांना अभिमान, गर्व आहे. आणि हे सगळ असचं घडलेले नाही तर यामागे शिक्षणाचा महत्वाचा वाटा आहे, आणि सोबतच अथक परिश्रम,मेहनत, जिद्द, चिकाटी, सातत्य आणि व्यवस्थेने दिलेली संधी..!
भारतीय व्यवस्थेने १९५० नंतर संविधानाच्या माध्यमातून सर्वच स्तरावरील स्त्रियांच्या विकासासाठी,प्रगतीसाठी संधीची कवाडे उघडी केलेली आहेत. योग्य शिक्षण,योग्य मार्गदर्शन आणि सर्वोच्च अंतिम ध्येय यासाठी माझ्या भगिनींनी प्रयत्न करावे अन् यातून सर्वोच्च शिखर गाठावे याच या जागतिक महिला दिनानिमित्त सदिच्छा..!
लेखन-
संदेश सविता शंकर पालये
M.A.,A.T.D.,A.M.
9527008676