(रत्नागिरी)
बांधकाम क्षेत्रातील प्रमुख घटक असलेले स्टील व सिमेंट उत्पादक समुहांकडून एकत्रितरित्या भाववाढ करण्यात येत आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्रातील साहित्याचे दर वाढत आहेत. जुन्या दरात निर्माणाधीन प्रकल्प पूर्ण करणे बांधकाम व्यावसायिकाला अडचणीचे असल्यामुळे घरांच्या किमती वाढविण्याशिवाय पर्याय उरलेला नाहीत, असे मत क्रेडाईचे माजी अध्यक्ष महेंद्र जैन यांनी व्यक्त केले आहे.
मागील काही दिवसांतील वाढत्या महागाईमुळे बांधकाम उद्योगामधील बांधकाम व्यावसायिकांसमोरील अडचणींमध्ये प्रामुख्याने लोखंडाच्या दरात तब्बल ११० टक्के, पीव्हीसी पाईप १०० टक्के सिमेंटच्या दरात ४४ टक्के तर अॅल्युमिनिअम तसेच इतर साहित्य व मजुरीही महागल्याने बांधकाम प्रकल्पांचा खर्च नियोजनाबाहेर गेला आहे. या वाढीव खर्चामुळे प्रति चौरस फूट घरांचे दर ४०० ते ६०० रुपयांपर्यंत वाढ झाल्याने या दरवाढीचा बांधकाम व्यावसायिक व घर घेणारे नागरिक दोघांना आर्थिक फटका बसणार आहे.
कोविडच्या कात्रीत सापडलेला व आर्थिक अडचणीत असलेल्या बांधकाम उद्योगाला बांधकाम साहित्यांच्या किंमतीत झालेल्या भरमसाठ भाववाढीचा फटका बसला आहे. कोविडनंतर बांधकाम व्यवसाय स्थिरावत असताना बांधकामासाठी आवश्यक सर्व घटकांची जबर दरवाढ झाली आहे. यात प्रामुख्याने स्टील, पीव्हीसी पाईप, अॅल्युमिनिअम, सिमेंट, कॉपर, मेटल, तसेच लेबर चार्जेस यात असह्य अशी वाढ झाल्याने बांधकाम व्यावसायिक यांचे आर्थिक गणित पूर्णतः कोलमडले आहे. केंद्रीय स्तरावर याबाबत तातडीने उपाययोजना न झाल्यास बांधकाम क्षेत्राची वाढ खुंटणार असून सर्वसामान्य नागरिकांचे गृहस्वप्न साकार होणे कठीण आहे.
बांधकामासाठी लागणारे स्टील, सिमेंट मजुरांचा खर्च यामध्ये वाढ झाली आहे. महारेरा कायद्यामुळे प्रकल्पाची एकदा ठरवलेली किंमत बदलत्या बांधकाम साहित्य दरवाढीनंतर बदलता येत नाही. तसेच ग्राहकांकडून देखील अतिरिक्त पैसे घेता येत नाही. यामध्ये बांधकाम व्यवसायिकांचे नुकसान होते. बांधकाम क्षेत्रात मनुष्यबळाची कमतरता आहे. टीडीआर कॉस्टमध्ये देखील वाढ होत चालल्याने चारही बाजूंनी बांधकाम व्यवसायिकांची अडचण आला आहे. जीएसटी आकारण्याचे ठरवून दिलेले टप्पे बदलणार असल्याने घर खरेदी करताना प्रति चौरस मीटर मागे ४०० ते ६०० रुपयांची दरवाढ होणार आहे.