(राजापूर)
वादविवादाच्या पार्श्वभूमीवर ओणी-अणुस्कुरा मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले असले तरी दररोज निर्माण होणारे पावसाळी वातावरण आणि नजीक असलेला पावसाळा लक्षात घेता तत्पूर्वी संपूर्ण मार्गावरील खड्डे बुजवून पूर्ण होतील का याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. संपूर्ण रस्त्यावरील खड्डे न बुजल्यास मात्र पावसाळ्यात या मार्गाने प्रवास करणे खूपच त्रासदायक ठरणार आहे.
गतवर्षी पावसाळ्यात खराब झालेल्या ओणी-अणुस्कुरा मार्गाच्या दुरुस्तीला उन्हाळ्यात काही मुहूर्त सापडला नाही. सात कोटी सव्वेचाळीस लाखाचा निधी उपलब्ध होऊन देखील मार्ग दुरुस्तीचे काम अंतर्गत राजकारणात अडकल्यामुळे आणि त्यातून प्रकरण न्यायप्रविष्ठ बनल्याने उन्हाळा संपत आला तरी कामाला सुरवात झालेली नव्हती; मात्र संपूर्ण रस्त्यात आणि अणुस्कुरा घाटाची एकूणच विदारक स्थिती पाहता संबंधित बांधकाम विभागाने निविदा मंजूर झालेल्या ठेकेदाराकडून तूर्तास पडलेले खड्डे भरायला सुरवात केली आहे. यामध्ये अणुस्कुरा घाटातील खड्ड्यांची स्थिती पाहता प्रथम घाटातील खड्डे बुजवायला सुरवात झाली आहे. त्यानंतर उर्वरित खड्डे भरले जाणार आहेत.
यामध्ये सौंदळ, रायपाटण, पाचल परिसरात तर रस्त्याची चाळण झालेली आहे. काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून ते जर पावसाळ्यापूर्वी भरले गेले नाहीत तर रस्त्यात खड्डे का खड्डयात रस्ता तेच कळणार नाही अशी स्थिती राहणार आहे. शिवाय सौंदळ, रायपाटण भागात लांबलचक पट्टेच पूर्ण खराब झाले आहेत.
सध्या सुरू असलेले खड्डे बुजवण्याचे काम पाहता पावसाळा सुरू होण्यापूर्वी या संपूर्ण मार्गावरील खड्डे पूर्ण भरले जातील का, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. जर पाऊस सुरू होण्यापूर्वी हे काम अपूर्ण राहिले तर आगामी पावसाळ्यात या मार्गाने प्रवास करणे खूप त्रासदायक ठरणार आहे. विशेषतः दुचाकी वाहनांवरून प्रवास करणे खूपच धोकादायक ठरणार आहे.