(मुंबई)
मुलुंडच्या पोपटलालने ५ अबला महिलांचे शोषण केले असून त्या महिला आमच्याकडे आल्या आहेत. आम्ही त्यांना जनतेच्या न्यायालयात हजर करणार आहोत, असा दावा करीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर नाव न घेता महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप केला.
तर कोरोना काळातील खिचडी घोटाळ्यातील लाभार्थी हे आज भाजप आणि शिंदे गटात आहेत. या लाभार्थ्यांनी खिचडीचे वाटप न करताच पैसे लाटल्याचा आरोपही त्यांनी केला. या घोटाळ्यातील लाभार्थ्यांची नावे घेण्याची हिंमत पोपटलाल दाखवणार का, असे आव्हानच राऊत यांनी सोमय्या यांना दिले. संजय राऊत यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना किरीट सोमय्या यांच्यावर नाव न घेता गंभीर आरोप केला. आमच्याकडे ५ महिला आल्या आहेत. मुलुंडच्या पोपटलालने त्यांचे शोषण केले आहे. त्याविरोधात या महिला तक्रार द्यायला तयार आहेत. आम्ही त्यांना जनतेच्या न्यायालयात हजर करू, पण अशा प्रकारचे राजकारण करू नये असे आम्हाला वाटते. त्या पोपटलालला पत्नी, सून, कुटुंब आहे. त्याने आम्हाला आव्हान देऊ नये, असा इशारा राऊत यांनी दिला.
राऊत यांचे सोमय्यांना आव्हान
महाराष्ट्रातून पळवले जाणारे उद्योग, आठ हजार कोटींचा अम्ब्युलन्स घोटाळा, राहुल कुलचा मनी लाँड्रिंग घोटाळा, अजित पवार यांचा ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा, हसन मुश्रीफ यांचा घोटाळा यावर बोला, असे आव्हानच राऊत यांनी सोमय्या यांना दिले. मेट्रो डेअरी, मोतीलाल ओसवाल यांसारख्या उद्योजकांवर आरोप करून त्यांच्याकडून युवा प्रतिष्ठानसाठी कोट्यवधी रुपयांच्या देणग्या उकळल्या आहेत, असा आरोप करीत धर्मादाय आयुक्तांनी या देणगीदारांची नावे जाहीर करावीत, अशी मागणीही त्यांनी केली.