मुंबई विमानतळावर महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने (डीआरआय) केलेल्या कारवाईत ८ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. बाजारात त्याचे मुल्य साडे चार कोटी असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी दोघा तस्करांना अटक करण्यात आली आहे, हे दोघेही दिल्लीचे आहेत. हे प्रवासी दुबईतील एका व्यक्तीसाठी सोन्याची तस्करी करत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. तसेच याआरोपींनी यापूर्वीही अशा प्रकारे सोन्याची तस्करी केल्याचा संशय आहे.
परदेशातून सोन्याची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर डीआरआयने छ. शिवाजी महाराज टर्मिनसवर सापळा रचला होता. त्यावेळी दुबईहून आलेला संशयित अब्दुल बासीत याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीने कपड्यांमध्ये ३९०० ग्रॅम सोने लपवले होते. त्याची किंमत २ कोटी १५ लाख १३ हजार रुपये असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. त्यानंतर अन्य एक प्रवासी मोहम्मद सलमान याला डीआरआयने ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्याच्याकडील चार पाकिटांमध्ये आणखी सोने लपवल्याचे निष्पन्न झाले. तपासणीत सलीमकडे ४ किलो ३३० ग्रॅम सोने सापडले. त्याची किंमत दोन कोटी ३९ लाख रुपये असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.