(सिंधुदुर्ग)
दक्षिण कोकणचे प्रती पंढरपूर आणि लोटांगण साठी प्रसिध्द असणाऱ्या सोनुर्ली येथील श्री देवी माऊली वार्षिक जत्रोत्सव येत्या दि. 28 नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा व कर्नाटक राज्य आणि महाराष्ट्र राज्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात तसेच लोटांगण नवसही फेडतात.
श्री देवी माऊली जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. देवीच्या वार्षिक जत्रोत्सवासाठी लाखो भाविक उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतात. जिल्ह्यातील मोठ्या जत्रांना सोनुर्लीच्या जत्रेपासून प्रारंभ होतो. या जत्रोत्सवाला महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या तसेच इतर राज्यातून मोठ्या संख्येने भाविक नवस बोलणे व नवस फेडण्यासाठी येत असतात. या जत्रोत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सोनूर्ली माऊली देवस्थानं कमिटी पदाधिकरी यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठी लोटगंण जत्रा म्हणून सोनुर्ली श्री देवी माऊलीची जत्रा प्रसिद्ध आहे. या देवीचे महात्म्य सातासमुद्रापार पोहोचले असून नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी देवी म्हणून माऊली चरणी दरवर्षी हजारो भक्तगण नतमस्तक होतात. आपल्या अडी-अडचणी दुर करण्यासाठी देवीकडे लोंटागणाचा नवस बोलला जातो, आणि जत्रोत्सवादिवशी रात्री तो फेडला जातो. नवस केलेल्या महिला उभ्याने मंदिराभोवती प्रदक्षिणा घालून हा नवस फेडतात तर पुरुष जमिनीवर लोटांगण घालून नवस फेडतात. दरवर्षी चार ते पाच हजार भाविक लोटांगण घालतात. देवस्थान कमिटी कडून भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी योग्य नियोजन केले जाते.
जत्रोत्सवाला लोटणारी गर्दी पाहता पोलीस प्रशासनाकडूनही योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवला जातो तर देवस्थान कमिटी कडूनही भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी योग्य नियोजन केले जाते. जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या देवस्थान कमिटी कडून हालचालींना वेग आला आहे त्या दृष्टीने मंदिर परिसरात कामकाज सुरू आहे.