(नागपूर)
नागपूर शहरातील नामांकित जीएस महाविद्यालयातील प्राध्यापकाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गजानन कराळे (४१) असे त्यांचे नाव आहे. आत्महत्येअगोदर त्यांनी लिहिलेल्या पत्रात पत्नी व मुलाची माफी मागितली. तसेच तणावामुळे आत्महत्या करत असल्याचे स्पष्ट केले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. गजानन कराळे हे मूळचे अमरावतीचे होते. मात्र, ते मागील काही वर्षांपासून नागपुरमधील नरेंद्रनगर येथे राहत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महाविद्यालयातील अंतर्गत राजकारणामुळे ते त्रस्त होते. काही प्राध्यापक त्यांना त्रास देत होते. सुट्ट्या घेण्यासदेखील त्यांना अडचणी येत होत्या. त्यामुळे ते मानसिक तणावात होते. त्यांनी आपल्या मनातील सल पत्नी व नातेवाइकांनादेखील बोलून दाखवली होती. शनिवारपासून त्यांनी पत्नी व मुलाला नातेवाईकांकडे लग्न समारंभासाठी अमरावतीला पाठवून दिले होते. त्यानंतर त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच बेलतरोडी पोलीस ठाण्याचे पथक त्यांच्या घरी पोहोचले. यावेळी पोलिसांना सहा पानांची सुसाइड नोट सापडली. या प्रकरणी अकस्मिक मृत्यूची नोंद करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
आपल्या मनातील तणाव ते कायम नातेवाइकांजवळ बोलून दाखवायचे. आत्महत्या करण्याअगोदर त्यांनी त्यांच्या जावयाला फोन केला होता. काही दिवसांपासून आपण तणावात असल्याचे त्यांनी सांगितले होते. मी कधीही कुणाचे वाईट केले नाही, तरीपण मला लोक त्रास का देतात, असा सवाल त्यांच्या मनात होता. महाविद्यालयातील तणावाबाबत त्यांनी पत्नीलाही सांगितले होते. काहीजण मला खोट्या चौकशीत फसवून नोकरी घालवण्याचा प्रयत्न करत असून, यामुळे तणावात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती. त्यांची पत्नी नेहमी त्यांची समजूत काढायची. आत्महत्येअगोदर त्यांनी सुसाइड नोट लिहिली व त्यात ‘सॉरी …मी तुझ्या इच्छा पूर्ण करू शकलो नाही. सॉरी बाळा, मी तुझ्या भविष्यासाठी काहीही करू शकलो नाही’, असे नमूद केले.
नागपुरातील अनेक महाविद्यालयांत राजकारण आणि त्यातून निर्माण होणारे तणाव ही चिंतेची बाब झाली आहे. या प्रकरणात आता पोलिस नेमके कुणावर कारवाई करतात याकडे नातेवाइकांचे लक्ष लागले आहे. महाविद्यालयातील माजी प्राचार्य, उपप्राचार्य, त्रास देणारे प्राध्यापक यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी नातेवाइकांनी केली आहे.