(श्रीहरिकोटा)
‘चांद्रयान-3’च्या अभूतपूर्व यशानंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्रो’कडून सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य एल-1’ ही मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यानुसार आज शनिवारी (दि. 2) सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी येथील सतीश धवन केंद्रातून ‘आदित्य एल-1’चे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
ही भारताची पहिलीच सौरमोहीम असणार आहे. याची तयारी पूर्ण झाली असून, ‘आदित्य एल-1’ उपग्रह श्रीहरिकोटा येथील लाँच पॅडवर सज्ज झाला आहे. या मोहिमेची रंगीत तालीमही यशस्वीरीत्या पार पडली आहे. ‘इस्रो’ने याबाबत ट्विटद्वारे माहिती दिली आहे. ‘आदित्य एल-1’ला अवकाशात घेऊन जाणार्या ‘पीएसएलव्ही-सी 57’ या रॉकेटचे काही फोटोही ‘इस्रो’ने पोस्ट केले आहेत. श्रीहरिकोटा येथील दुसर्या लाँच पॅडवरून हे रॉकेट प्रक्षेपित करण्यात येणार आहे.
प्रक्षेपणानंतर सुमारे चार महिने हा उपग्रह अंतराळात प्रवास करेल. सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये असणार्या एका लॅग्रेंज पॉईंटवर तो ठेवण्यात येईल. हा पॉईंट पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर दूर आहे. हे अंतर चंद्राच्या तुलनेत चार पटींनी अधिक आहे. त्यामुळे या ठिकाणी पोहोचण्यासाठी ‘आदित्य एल-1’ला सुमारे चार महिन्यांचा कालावधी लागेल, असा ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
सूर्याच्या निरीक्षणासाठी स्वदेशी वेधशाळेचे स्वप्न पुण्यातील शास्त्रज्ञांनी २०११-१२ मध्ये पाहिले होते. तब्बल दशकभराच्या प्रतीक्षेनंतर आज ‘आदित्य एल-१’ ही सौरवेधशाळा पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर अंतराच्या प्रवासासाठी अवकाशात झेपावत आहे. भारताची चांद्रयान-३ ही मोहीम यशस्वी होऊन केवळ दहाच दिवस झाले असताना दुसऱ्या मोठ्या अवकाशमोहिमेला सुरुवात होत आहे.
प्रक्षेपण केंद्रावर ‘पीएसएलव्ही’ यानाला आणण्यात आले असून सर्व चाचण्याही पूर्ण झाल्या आहेत. एल-१ या बिंदूपर्यंत जाऊन तेथून सूर्याच्या प्रभामंडळाचा अभ्यास करणे आणि सौर वाऱ्यांचा अभ्यास करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. अभियंता म्हणून नऊ वर्षे आम्ही ‘आदित्य-एल-१’च्या ‘सूट’ उपकरणावर काम केले आहे. प्रत्यक्ष जागेवर पोहोचून ‘आदित्य-एल-१’ पहिले छायाचित्र पाठवेल, तेव्हा खऱ्या अर्थाने आमच्या नऊ वर्षांच्या मेहनतीचे चीज होईल, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.