( नॉटिंघम )
इंग्लंड – भारत यांच्यात रविवार 10 जुलै रोजी झालेल्या तिसऱ्या टी -20 सामन्यात इंग्लंडने शेवटचा सामना जिंकत शेवट मात्र गोड केला आहे. तर भारताच्या सूर्यकुमार यादवची वादळी शतकी खेळी मात्र संघाला तारू शकली नाही.
इंग्लंडने दिलेल्या 216 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना भारताला 198/9 पर्यंतच मजल मारता आली. सूर्यकुमार यादवने 55 बॉलमध्ये 117 वादळी खेळी करत भारताला आशा शेवटच्या क्षणापर्यंत जिवंत ठेवण्याच्या प्रयत्न केला मात्र त्याच्या प्रयत्नाला यश आले नाही. या त्याच्या वादळी खेळीमध्ये 14 चौकार आणि 3 उत्तुंग षटकार पाहायला मिळाले.
भारताला चांगल्या सुरूवातीची गरज असताना 31 रनवरच तीन विकेट गमावल्या. ऋषभ पंत 1, विराट आणि रोहित प्रत्येकी 11-11 रन करून माघारी परतले. तीन विकेट गेल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. या दोघांनी 61 बॉलमध्ये 119 रनची पार्टनरशीप केली, पण सगळं आक्रमण एकट्या सूर्यानेच केलं. सूर्यकुमार यादवसोबतच्या शतकी पार्टनरशीपमध्ये श्रेयस अय्यरने 23 बॉलमध्ये 28 रन केले. एवढ्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करत असताना श्रेयस अय्यरने फक्त 121.74 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. श्रेयस अय्यर ऐन मोक्याच्या क्षणी बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या गोठात आनंद पसरला होता. परंतु मैदानावर असलेल्या सूर्यकुमार यादवमुळे मात्र त्यांची पुरती तंतरली होती. भारतीय संघ आशा ठेवून असतानाच मोठा उत्तुंग षटकार मारण्याच्या नादात सूर्यकुमार यादव बाद झाला. भारतीय संघात सन्नाटा पाहायला मिळाला. त्यानंतर आवेश खान आणि हर्षल पटेल भारतीय संघाला वाचवू शकले नाहीत.
तीन सामन्यांच्या टी-20 सीरिजमध्ये टीम इंडियाने पूर्वीच मालिका खिशात घातली होती. मात्र इंग्लंड साठी हा सामना प्रतिष्ठेचा होता. त्यांनी शेवटचा सामना जिंकून शेवट गोड केला.