(बंगळुरू)
चांद्रयान-३’च्या यशानंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य एल-१’ ही मोहीम पार पाडणार आहे. ही भारताची पहिलीच सौरमोहीम असणार आहे. याची तयारी पूर्ण झाली असून, ‘आदित्य’ उपग्रह श्रीहरीकोटा येथील लाँच पॅडवर सज्ज झाला आहे. इस्रोने याबाबत माहिती दिली. आदित्यला अवकाशात घेऊन जाणाऱ्या पीएसएलव्ही-सी५७ या रॉकेटही अवकाशात झेप घेण्यासाठी सज्ज झाला आहे. यामध्ये आदित्य उपग्रह देखील आहे. श्रीहरीकोटा येथील लाँच पॅडवरुन हे रॉकेट प्रक्षेपित करण्यात येणार आहे.
शनिवार, २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी आदित्य एल-१ चे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यानंतर सुमारे चार महिने हा उपग्रह अंतराळात प्रवास करेल. सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये असणाऱ्या एका लँग्रेज पॉइंटवर हा उपग्रह ठेवण्यात येईल. पृथ्वीपासून अंदाजे १५ लाख किलोमीटर अंतरावर हे यान स्थिरावणार आहे. इस्रोने सांगितले की, आदित्य एल-१ मोहिमेचा उद्देश, एल-१ च्या कक्षेतून सूर्याचा अभ्यास करणे आहे. वेगवेगळ्या वेव्हबँड्समध्ये फोटोस्फियर, क्रोमोस्फियर आणि सूर्याच्या सर्वात बाहेरील थर, कोरोनाचे निरीक्षण करण्यासाठी हे यान सात पेलोड्स घेऊन जाणार आहे.
इस्रोच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आदित्य एल-१ हे राष्ट्रीय संस्थांसोबत भागीदारी करून पूर्णपणे स्वदेशी पद्धतीने विकसित करण्यात आले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स (आयआयए), बेंगळुरू, ही ‘दृश्य उत्सर्जन लाइन कोरोनाग्राफ पेलोड’ विकसित करणारी एक आघाडीची संस्था आहे. त्याचवेळी इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स, पुणे यांनी या मिशनसाठी सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजर पेलोड विकसित केले आहे. इस्रोने सूर्य निरीक्षणासाठी प्रक्षेपित केलेली ही पहिली समर्पित भारतीय अंतराळ मोहीम असेल.
आदित्य एल-१ मोहिमेबद्दल इस्रोने आज सांगितले की, प्रक्षेपण तालीम आणि रॉकेटची अंतर्गत तपासणी पूर्ण झाली आहे. आदित्य एल-१ अंतराळयान सौर कोरोनाच्या दूरस्थ निरीक्षणासाठी आणि एल-१ वर (सूर्य-पृथ्वी लॅग्रॅन्जियन पॉइंट) सौर वाऱ्याच्या स्थितीचे निरीक्षण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
हा पॉइंट पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर दूर आहे. हे अंतर चंद्राच्या तुलनेत चार पटींनी अधिक आहे. त्यामुळे, या ठिकाणी पोहोचण्यासाठी ‘आदित्य’ला सुमारे चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. सूर्याचा सर्वसमावेशक अभ्यास आणि निरीक्षण करण्यासाठी हा उपग्रह इतर सहा उपकरणे देखील घेऊन जाणार आहे.