( क्रिकेट विश्व )
सध्या टीम इंडिया मध्ये बोलबाला आहे तो तडाखेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव याचा. त्याने मारलेले गगनचुंबी षटकार, शरीराची लवचिकता, सहज आणि सोप्या पद्धतीने मारलेले स्ट्रोक सध्या तरुणांसाठी आकर्षण ठरत आहे. तळपत्या सूर्याला फलंदाजी करताना पाहण्यासाठी चाहते आता आतुरतेने वाट पाहत असतात. सद्या तो तरुणांच्या गळ्यातील ताईत ठरला आहे.
सूर्यकुमारने फर्स्टक्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तो दिवस आहे 15 डिसेंबर 2010. सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तो दिवस आहे 14 मार्च 2021. डोमेस्टिक क्रिकेट ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट या स्थित्यंतरासाठी सूर्यकुमारने 11 वर्षांहून अधिक काळ प्रतीक्षा केली. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या वर्ल्डकप स्पर्धेत सूर्यकुमारची बॅट सध्या तळपते आहे. भारतीय संघाने वर्ल्डकपची सेमी फायनलपर्यंत मजल मारली आहे. यामध्ये सूर्यकुमारचा सिंहाचा वाटा आहे. पण त्याची इथपर्यंतची वाटचाल अतिशय खडतर आहे. 360 डिग्री मध्ये म्हणजे मैदानात कुठेही उत्तुंग फटके मारणाऱ्या सूर्यकुमारची एबी डीव्हिलियर्सची तुलना होताना दिसते आहे.
खेळाडूंसाठी तिशी ही कारकीर्दीची संध्याकाळ मानली जाते. ऑस्ट्रेलियाच्या माईक हस्सिलाही वयाच्या तिशिमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये संधी मिळाली. हसीप्रमाणेच सूर्यकुमारला तिशीत संधी मिळाली. संधी मिळाल्यानंतर अवघ्या दीड वर्षात सूर्यकुमारने ट्वेन्टी-20 प्रकारात आयसीसी बॅटिंग क्रमवारीत अव्वलस्थानी झेप घेतली आहे. क्षमता, कौशल्य, फिटनेस, दडपण हाताळण्याची कणखरता, अभ्यास या सगळ्या आघाड्यांवर सूर्यकुमारने स्वत:ला सिद्ध केलं आहे. यामुळेच सूर्यकुमारचे परदेशातही चाहते निर्माण झाले आहेत.
सूर्यकुमार आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून खेळला. गौतम गंभीरने या गुणवत्तेला संधीही दिली. पण सूर्यकुमारला आणखी खेळायला मिळालं तर तो मोठा खेळाडू होऊ शकतो हे ताडलं मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा, मुंबई इंडियन्स संघव्यवस्थापन यांनी. 2018 मध्ये मुंबई इंडियन्सने लिलावात सूर्यकुमार यादवला आपल्याकडे वळवलं आणि सूर्यकुमारचं नशीब पालटलं. सूर्यकुमार मुंबई इंडियन्सचा कणा झाला तरीही भारतीय संघाची दारं त्याला उघडी करून देण्यात आली नाहीत. आयपीएल स्पर्धेत धावांच्या राशी ओतत असतानाही सूर्यकुमारला वेटिंगवर ठेवण्यात आलं. अखेर 2021 मध्ये त्याला भारतीय कॅप देण्यात आली. त्यानंतर मात्र त्याने संधीच सोन केलं.
सूर्यकुमारचे वडील हे भाभा अटॉमिक रिसर्च सेंटर इथे कार्यरत आहेत. आई गृहिणी, बहीण आणि सूर्यकुमार आणि त्याची पत्नी असे हे कुटुंब चेंबूरजवळच्या अणुशक्ती नगरमध्ये राहतात. अभ्यासापेक्षा क्रिकेटमध्ये रस आहे हे सूर्यकुमारच्या घरच्यांच्या लक्षात आलं. परिसरातल्या टेनिस बॉल स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरीनंतर सूर्यकुमारने एमसीएच्या वयोगट स्पर्धांमध्ये खेळायला सुरुवात केली. मजल दरमजल करत सूर्यकुमारने मुंबई संघात स्थान मिळवलं. दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत जागतिक ट्वेन्टी20 क्रमवारीत सूर्यकुमार अव्वल स्थानी आहे. ट्वेन्टी20 प्रकारात त्याच्या नावावर एक शतकही आहे. 2007 नंतर भारताला वर्ल्डकप जिंकायचा असेल तर सूर्यकुमारकडून भारतीय संघाला मोठ्या अपेक्षा आहेत.
सूर्यकुमारच्या नावात फार मोठी शक्ती आहे. त्याच इंग्रजीत surykumar अस नाव आहे. त्याची आद्याक्षरं जोडली तर sky (स्काय) असं नाव तयार होतं. गंभीरने त्याच्या हे लक्षात आणून दिलं. आज सूर्यकुमार खोरखरच आकाशाला गवसणी घालणारा खेळाडू ठरत आहे.