(मुंंबई)
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियान आत्महत्या प्रकरणात अद्याप ठोस काही हाती लागले नसून या प्रकरणी उलटसुलट चर्चा, दावे-प्रतिदावे सुरू असल्याचेच दिसत आहे. यातच आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांची या प्रकरणात चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर पहिली सुनावणी झाली असून, लवकरच सविस्तर सुनावणी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
राशिद खान पठाण यांनी ही जनहित याचिका दाखल केली असून यावर नुकतीच प्राथमिक सुनावणी उच्च न्यायालयाचे मु‘य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे झाली. या याचिकेत केंद्रीय तपास यंत्रणेतील सीबीआय अधिकार्यांवरही ढिलाईने काम केल्याबद्दल कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तसेच राज्याच्या महाधिवक्त्यांना सीबीआयविरोधात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचा अवमान केल्याबद्दल याचिका दाखल करण्याचा आदेश देण्यात यावा, असेही म्हटले आहे.
दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची का गरज आहे? हे पटवून देताना अनेक दावे आणि आरोप या याचिकेत करण्यात आले आहेत. 8 जून 2020 रोजीचे दिशा सालियन, आदित्य ठाकरे, राहुल कनाल, सूरज पांचोली, सचिन वाझे, एकता कपूर यांचे मोबाईल लोकेशन तपासले जावे. कारण त्या रात्री हे सगळे 100 मीटरच्या परिसरात एकत्रच होते, असा दावा करण्यात आला आहे. तसेच 12 व 13 जून 2020 रोजीचे सुशांतसिंह राजपूत, रिया चक्रवर्ती, आदित्य ठाकरे, अरबाज खान, संदीप सिंह, शौविक चक्रवर्ती या सर्वांचेही मोबाईल लोकेशन तपासले जावेत. तसेच या दोन्ही दिवसांचे आसपासच्या परिसरातील आदित्य ठाकरेंशी संबंधित सारे सीसीटीव्ही फुटेज तपासले जावे, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
दरम्यान, सुशांतचा मृत्यू झाला त्यादरम्यान आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यात 44 वेळा फोनवर काय बोलणे झाले? याची चौकशी व्हायला हवी. सुशांत आणि दिशाच्या मृत्यूवर प्रश्न उपस्थित करणार्या सर्व साक्षी पुराव्यांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही जनहित याचिकेत करण्यात आली आहे.