(मुंबई)
एसटीमधील प्रवासी आणि वाहक यांच्यामध्ये सुट्या पैशावरून होणारे वाद लवकरच संपुष्टात येणार आहेत. येत्या १५ जूनपर्यंत राज्यभरातील ३५ हजार कंडक्टरांना ३८ हजार ५०० अँड्रॉइड तिकीट मशीन उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यामुळे प्रवाशांना पुढील काळात गुगल पे, कार्ड पेमेंट, फोन पे यांसारख्या डिजिटल पद्धतीने सहज तिकीट काढता येणार आहे.
एसटी महामंडळात अनेक नावीन्यपूर्ण बदल होत आहेत. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीचा मोफत प्रवास, महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत अशा सुविधांनी एसटी महामंडळ उभारी घेत आहे. यामध्ये आणखी भर म्हणजे रखडलेल्या अँड्रॉइड तिकीट मशिनचा मार्ग मोकळा झाला आहे. एसटीचा प्रवास करताना सुट्या पैशांसाठी वाहक व प्रवासी यांच्यात नेहमीच वाद होतात. ही समस्या सोडवण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने अँड्रॉइड मशीन देण्याचे नियोजन केले आहे. मशीनमुळे प्रवाशांना तिकिटाची रक्कम थेट ऑनलाइन देता येणे शक्य होणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून विनावाद एसटी प्रवास सुलभ होणार आहे.
प्रायोगिक तत्त्वावर मुंबई आणि ठाणे विभागाला २ हजार ५०० मशिन्स प्राप्त झाल्या आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत मुंबई- ठाण्यातील एसटी वाहक प्रत्यक्षपणे या नव्या मशीनचा वापर करणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.