(संगमेश्वर)
सुट्टीवर आलेल्या एका सैनिकास काही नागरिकांनी मारहाण केल्याने माजी सैनिक संघटना आक्रमक झाली असून, चिपळूण पोलिसात त्यांनी निवेदन दिले आहे. सध्या सेवेत सैनिक असलेले भरत विजय सावंत (३२, रा. राधाकृष्ण नगर, चिपळूण) हे सुट्टीवर असताना २१ डिसेंबर २०२३ ला बहादूरशेख नाका ते मूळ गाव तोंडली असा दुचाकीने प्रवास करत होते. हा प्रवास करताना कामथे ग्रामपंचायत येथे दुपारी १२.१५ वाजता फोनवर वारंवार रिंग वाजल्याने त्यांनी आपली दुचाकी रस्त्याच्या बाजूला दुचाकी थांबवून संभाषण करत होते.
दरम्यान त्यानंतर त्याच मार्गावरुन चुकीच्या दिशेने येणाऱ्या चारचाकी वाहनातून आलेल्या तीन नागरिकांनी या सैनिकाशी वाद घालून मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी भरत सावंत यांनी मारहाण करणाऱ्यांना आपण सेवारत सैनिक असून ओळखपत्रही दाखवले, तरी त्या नागरिकांनी मारहाण चालूच ठेवली.
या घटनेबाबत पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करण्यात आली. त्याबाबत पोलिसांनी संबंधितांची मेडिकल तपासणी केली का ? सेवेत असणाऱ्या सैनिकाला मारणे हा गुन्हा असताना केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आम्हाला योग्य ती माहिती द्यावी, अशी मागणी संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे.