(सातारा)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसाच्या सातारा दौऱ्यावर असून त्यांचे मुळगाव असलेल्या महाबळेश्वर येथील दरे गावातील स्वतःच्या शेताची पाहणी करत शेतीमध्ये सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. राज्यातील सत्तासंघर्ष सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांसाठी सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळ गावी मुक्कामी आले आहेत. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वत:च्या शेताची पाहणी करुन शेतातील पिकाची मशागतही केली.
मुख्यमंत्री झाल्यानंतर ते यापूर्वी गावी आले होते, पण त्यांना मुसळधार पावसामुळे ग्रामदैवत उत्तरेश्वराचे दर्शन घेता आले नव्हते. त्यामुळे गावी आल्यावर त्यांनी प्रथम आपल्या ग्रामदैवताचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी सातारा जिल्ह्यातील प्रशासकिय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्यातील पर्यटनाच्या वाढीसाठी कशा पद्धतीने प्रयत्न करता येतील, याबाबत चर्चा केली. गावचा सुपुत्र राज्याचा मुख्यमंत्री झाल्याने गावकऱ्यांनीही एकनाथ शिंदे यांचं जल्लोषात स्वागत केले.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या शेतात फेरफटका मारला. त्यांच्या शेतात चंदन त्यात गवती चहा, हळद ,हिरवी मिरची आदी पिकांची लागवड केली आहे. त्याची पाहणी केली. त्यानंतर शेतात आज स्ट्रॉबेरीची लागवडीचे काम सुरू होते. तिथे त्यांनी लागवडीच्या कामाला शेतमजूरांसोबत हातभार लावला. तसेच कोळप्याच्या सहाय्याने हळदीतील गवत काढले. आपल्या शेतातील कामे आटोपल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी इलेक्ट्रिक बग्गीमधून गावात फेरफटका मारत ग्रामस्थांशी संवाद साधला.