(रत्नागिरी / प्रतिनिधी)
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यातील सर्व डाकघर कार्यालयांमध्ये सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत दि. ९ व १० फेब्रुवारी रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डाकघर अधिक्षक एन.टी. कुरळपकर यांनी दिली.
जिल्ह्यातील डाकघर कर्मचारी यांच्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायत, अंगणवाडी व बाल विकास प्रकल्प अधिकारी येथे प्रबोधन करण्यात येत आहे. या विशेष अभियानात जवळच्या डाकघरात सुकन्या समृद्धी योजनेमध्ये मुलींचे खाते उघडता येणार आहे. हे खाते उघडण्यासाठी योजनेचा डाक कार्यालयातील विहित नमुन्यातील अर्ज, मुलीचे जन्म प्रमाणपत्र, मुलीचे आणि पालकाचे आधारकार्ड, पॅनकार्ड आणि मुलगी व पालकाचे प्रत्येकी दोन फोटो तसेच रहीवासी पुराव्यासाठी आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत.
वरील दोन दिवशी राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा जास्तीत जास्त पालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री कुरळपकर यांनी केले आहे.