(रत्नागिरी)
सी. ए. इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे फॉरेन्सिक ऑडीट तसेच पब्लिक ट्रस्ट कायद्यातील तरतुदी यावर हॉटेल व्यंकटेश येथे एकदिवशीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात मार्गदर्शनाकरिता मुंबईतील सी. ए. सुश्रुत चितळे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने चर्चासत्राचे उद्घाटन झाले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना सी. ए. चितळे यांनी सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात फॉरेन्सिक ऑडिट ही सीएंकरिता एक नवीन संधी असून महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र पोलिस, सीबीआय यांच्याकरिता सीए फॉरेन्सिक ऑडिटर म्हणून सेवा देऊ शकतात. यासंदर्भात विस्तृत विवेचन सी. ए. चितळे यांनी केले.
दुसऱ्या सत्रात सी. एं. नी स्वतःच्या ऑफिसचे करावयाचे व्यवस्थापन त्या अनुषंगाने राबवण्याच्या विविध पद्धती याबाबत सी.ए. चितळे यांनी मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात सी. ए. चंद्रशेखर वझे (मुंबई) यांनी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संदर्भात कायदेशीर व लेखापरीक्षणाच्या अनुषंगाने ट्रस्टी तसेच सी. ए. यांनी करावयाच्या पूर्तता याबाबत सखोल विवेचन केले. पब्लिक ट्रस्टच्या स्थापनेपासून विविध कायदेशीर बाबी ट्रस्टींनासुद्धा पूर्ण कराव्या लागतात. त्यावर सी. ए. वझे यांनी विस्ताराने चर्चा केली.
या कार्यक्रमात ज्येष्ठ सी. ए. हेरंब पटवर्धन यांच्या कारकिर्दीस ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ज्येष्ठ सी. ए. शशिकांत काळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तीन सत्रांमध्ये अनुक्रमे सी. ए. अॅंथोनी राजशेखर, सी. ए. नीळकंठ मराठे आणि सी. ए. शशिकांत काळे यांनी अध्यक्षपद भूषवले. या कार्यक्रमास सी. ए. इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष सी. ए. प्रसाद आचरेकर, उपाध्यक्ष सी. ए. मुकुंद मराठे, खजिनदार सी. ए. केदार करंबेळकर, विकासा चेअरमन सी. ए. अभिलाषा मुळ्ये, समिती सदस्य सी. ए. शैलेश हळबे उपस्थित होते.
याप्रसंगी सारस्वत बॅंक संचालक सी. ए. सुनील सौदागर यांनी बॅंकेच्या प्रगतीचा उपस्थितांसमोर आढावा मांडला. सी. ए. कमलेश मलुष्टे यांनी सूत्रसंचालन केले. सी. ए. मोनाली कुलकर्णी यांनी आभार मानले.