(रत्नागिरी )
सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे मारुती मंदिर येथील विवा एक्झिक्युटीव्ह येथे धर्मादाय संस्था आणि प्राप्तिकर कायदा, वस्तू व सेवा कर कायद्यातील बदलांविषयी आयोजित कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला. कार्यशाळेस रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५० सीए आणि धर्मादाय संस्थाचालकांनी हजेरी लावली. कार्यशाळेचे उद्घाटन सीए इन्स्टिट्यूटच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष सीए अर्पित काब्रा यांनी दीपप्रज्वलनाने केले.
उद्घाटनप्रसंगी सीए अर्पित काब्रा म्हणाले की, चार्टर्ड अकाउंटंट (सीए) हे देशातील एक उच्च विद्याविभूषित व देशातील सर्वांना आर्थिक शिस्त लावणारे प्रमुख असतात. अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या सीए इन्स्टिट्यूटतर्फे विद्यार्थी, सामाजिक संस्थांकरिता उपक्रम राबवण्यात येत आहेत. सीएंनी देश घडवण्यासाठी पुढे आले पाहिजे. फॉरेन्सिक ऑडिट, परदेशांतील कंपन्या, संस्थांचे ऑडिट करणे यासह जीएसटी विषयक आणि आर्थिक समस्या सोडवण्यासाठी सीएंनी पुढाकार घ्यावा. सीए शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, पर्यावरण विषयक उपक्रमही राबवावेत.
कार्यशाळेच्या सुरवातीला रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष सीए मुकुंद मराठे यांनी विविध कायद्यात होणाऱ्या बदलांमुळे आपण आपले ज्ञान अद्ययावत करण्यासाठी ही कार्यशाळा कशी उपयोगी ठरेल, हे विषद केले. तसेच रत्नागिरी शाखेच्या आगामी उपक्रमांविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन सीए धनश्री करमरकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सीए कार्यकारिणी समिती आणि रत्नागिरीतील सीएंनी मेहनत घेतली.
धर्मादाय संस्था समाजाच्या महत्वाच्या घटक आहेत. या संस्था करत असलेल्या विविध लोकोपयोगी कामांमुळे सरकार प्राप्तिकर कायद्यातून काही सवलत या संस्थांना देते. मागील काही वर्षांपासून सरकारने खोट्या धर्मादाय संस्था विरुद्ध कडक पावले उचलली आहेत. याचाच भाग म्हणून सरकारने विविध प्राप्तिकर कलम तसेच नियमांमध्ये बदल केले आहेत. जेणेकरून ज्या खरोखर उपयुक्त काम करणाऱ्या संस्था आहेत फक्त त्यांनाच लाभ मिळेल. याबाबतचे विस्तृत मार्गदर्शन या कार्यशाळेमुळे मिळाल्याच्या प्रतिक्रिया संस्थाचालकांनी व्यक्त केल्या.
कार्यशाळेत सीए इन्स्टिट्यूट पश्चिम विभागीय समितीचे सदस्य, नागपूर येथील सीए अभिजित केळकर यांनी धर्मादाय संस्था लेखापरीक्षण मधील अडचणी यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच कोल्हापूर येथील सीए गिरीश कुलकर्णी यांनी धर्मादाय संस्था आणि वस्तू व सेवा कर कायद्यातील बदलांवर विवेचन केले. पुणे येथील अर्थविषयक लेखक, सीए दिलीप सातभाई यांनी धर्मादाय संस्था आणि प्राप्तिकर कायद्यातील बदलांवर पीपीटीच्या माध्यमातून सुरेख मार्गदर्शन केले. नागपूर येथील सीए प्रणव अष्टीकर यांनी धर्मादाय संस्था यांच्या लेखापरीक्षण अहवालामधील महत्त्वपूर्ण बदलांबाबत बहुमोल मार्गदर्शन केले.