(रत्नागिरी)
सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे महिला दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यामध्ये आनंदी जीवन कसे जगावे आणि निरोगी आयुष्यासाठी महिलांनी आहार, पुरेशी झोप, ताणतणावाचे व्यवस्थापन कसे करावे याविषयी तज्ज्ञ महिलांनी मार्गदर्शन केले.
हॉटेल मथुरा एक्झिक्यूटीव्हच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. यामध्ये डॉ. प्रीती मुळ्ये यांनी निरोगी जीवन जगण्यासाठीचे मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, प्रादेशिक, हंगामी आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेले अन्न घ्यावे आहे. महिला अनेकदा आपल्या तब्बेतीकडे दुर्लक्ष करतात. पण कुटुंबात महिलेचे स्थान महत्त्वाचे असल्याने महिलांनी तब्बेत सांभाळली पाहिजे. ताजे अन्न खावे. बऱ्याचदा फ्रिजमध्ये ठेवून काही दिवसांनी अन्नपदार्थ खाल्ले जातात. तसे करू नये. जेवताना फोनवर बोलू नका, शांतपणे जेवा. शरीराला नियमित व्यायाम आवश्यक आहे. सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे. महिलांनी ताणतणावाचे सुयोग्य व्यवस्थापन करायला शिकावे.
डॉ. प्रा. निधी पटवर्धन यांनी महिलांना नित्यनियमित व्यायाम, योगासने, ध्यानधारणा केली पाहिजे, असे सांगितले. तसेच छोट्या मोठ्या गोष्टींवरून त्रागा करू नये, त्यामुळे आपल्यालाच त्रास होतो. आनंदी जगणे ही एक कला आहे. ती प्रत्येक महिलेने शिकून घ्यावी आणि निरोगी, निरामय जीवन जगावे. या कार्यक्रमाला प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी कार्यक्रमाला भेट देऊन सीए इन्स्टिट्यूटच्या कार्याची माहिती घेतली आणि संवाद साधला.
कार्यक्रमाला शाखा सचिव सीए शैलेश हळबे, कोषाध्यक्ष सीए अक्षय जोशी आणि सदस्य सीए प्रसाद आचरेकर यांच्यासह महिला सीए, सीए सभासदांच्या पत्नी, विद्यार्थिनी आणि सीए फर्ममधील महिला कर्मचारी आदी उपस्थित होते.
फोटो :
- सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे आयोजित महिला दिन कार्यक्रमात दीपप्रज्वलन करताना डॉ. प्रा. निधी पटवर्धन, सोबत डॉ. प्रीती मुळ्ये, सीए मुकुंद मराठे, सीए अभिलाषा मुळ्ये, सीए शैलेश हळबे आदी.
- प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांचा सत्कार करताना सीए अभिलाषा मुळ्ये, सोबत पदाधिकारी व महिला.