भाजपचे माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या व गुहागरचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी गेली दोन महिने दापोली-मुरुड किनारपट्टीवर राजकीय नेत्यांनी उभारलेल्या हॉटेल्स बंगले बाबत वारंवार माध्यमांसमोर वेगवेगळे आरोप करत विविध ठिकाणी तक्रारी केल्या. त्याचे दुष्परिणाम राजकीय नेत्यांपेक्षा स्थानिक आपलं व्यवसाय करणाऱ्याना शासकीय नोटीसा येऊ लागल्यामुळे आमचा स्थानिक उध्वस्त होतो कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सीआरझेडच्या निकषात राजकीय नेत्यांना टार्गेट करताना किनारपट्टीवरील स्थानिक पारंपरिक व्यावसायिकांना उध्वस्त करू नका. यासाठी आपण जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन देणार असल्याची माहिती दापोली मतदार संघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी दिली.
राज्यात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी या तीन राजकीय पक्षाची महाविकास आघाडी दीड वर्षांपासून सत्तेत आल्यापासून भाजपचे काही नेते वेगवेगळ्या नेत्यांना टार्गेट करण्यातच गुंतले आहेत.या मध्ये डॉ. किरीट सोमय्या यांनी तर आमच्या कोकण किनारपट्टीवर लक्ष केंद्रित करून सीआरझेड हाच मुद्दा पुढे करत सरसकट तक्रारीचा सपाटाच लावला आहे. खरतर राज्यातील शिवसेना नेत्यांना टार्गेट करताना आमच्या मूळ पारंपरिक व्यवसाय करणारे सुद्धा यामध्ये गुंतवले आहे. त्यांच्यासमवेत गुहागरचे माजी आमदार डॉ विनय नातू यांचा उघडपणे सहभाग दिसतोय. डॉ. नातू हे सुसंस्कृत व अभ्यासु आहेत. ते कोकणी माणसाच्या प्रत्येक अडीअडचणी काय आहेत हे चांगलेच जाणतात, असे असताना देखील ते डॉ. सोमय्या यांच्या प्रत्येक तक्रारी दाखल करताना हजर होते. कोकणातील पर्यटन वाढीसाठी त्यांचे वडील स्व. तात्यासाहेब नातू नेहमीच आघाडीवर असायचे स्व.तात्यासाहेब नातू यांचे कार्य सुद्धा महान असल्यामुळेच गुहागरवासियांनीच स्व. तात्यासाहेबांसह डॉ विनय नातू यांना अनेक वर्ष आमदार म्हणून निवडून दिले व त्याच नातूंनी कोकणाच्या पर्यटनावर प्रश्नचिन्ह निर्माण करावे याचेच आश्चर्य वाटते अशा शब्दात श्री. कदम यांनी नाराजी व्यक्त केली.