(चिपळूण)
मोबाईलमध्ये असलेले सीमकार्ड परत मागितल्याच्या रागातून एका व्यक्तीने पती-पत्नीच्या डोक्यात कोयतीने वार केल्याची घटना १९ ऑक्टोबरला सायंकाळी निवळी शिर्केवाडी येथे घडली. या मारहाणीत ते दोघेही गंभीर जखमी झाले असून याप्रकरणी सावर्डे पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेंद्र शांताराम जाधव (रा. ढोबवाडी, कुटरे) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याची फिर्याद लक्ष्मण किसन काटकर (रा. शिर्केवाडी, निवळी, मूळ रा. अस्तान, खेड) यांनी दिली आहे.
लक्ष्मण काटकर व महेंद्र जाधव हे निवळी – शिर्केवाडी येथे आंबा, काजूच्या बागेत साफसफाईच्या कामासाठी वास्तव्य करतात. महेंद्र जाधव याचा मोबाईल कुटरे-ढोबवाडी येथून हरविला होता. तो लक्ष्मण काटकर यांच्या नातेवाईकाला आढळून आल्याने तो मोबाईल महेंद्र जाधव याला देण्यात आला. लक्ष्मण काटकर यांनी महेंद्र जाधव याला ‘तुझ्या मोबाईलमध्ये असलेले सीमकार्ड माझे असून मला परत दे’ असे सांगितले. त्याचा राग येऊन जाधवने काटकर यांना शिवीगाळ करून तुला बघतोच अशी धमकी दिली. कोयतीने त्यांना वार केले.