(संगमेश्वर)
तालुक्यातील तुरळ येथे मुंबई-गोवा महामार्गावर युवा उद्योजक सिद्धेश ब्रीद यांच्या माध्यमातून मुंबईहून गणपतीसाठी कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोफत चहा, नाश्ता व रुग्णवाहिकेची सुविधा देण्यात आली आहे. या उपक्रमाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी कौतुक केले आहे. तुरळ येथे प्रत्यक्ष भेट देऊन त्यांनी सिद्धेश ब्रीद यांना धन्यवाद दिले.
सध्या गणेशोत्सवासाठी मुंबईहून मोठ्या प्रमाणावर चाकरमानी रत्नागिरी जिल्ह्यात येत आहेत. तुरळ येथे मुंबई- गोवा महामार्गावर सिद्धेश ब्रीद युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवा उद्योजक सिद्धेश ब्रीद यांनी गणेशभक्तांसाठी मोफत चहा, नाश्ता व रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. रत्नागिरीच्या दौऱ्यावर आलेले पालकमंत्री उदय सामंत यांनी तुरळ येथे भेट दिली. मंत्री सामंत यांनी स्वतः गणेशभक्तांना चहा, नाश्त्याचे वाटप केले. तसेच सिद्धेश ब्रीद यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.