(सिंधुदुर्ग)
तळकोकणातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ओसरगावमधील टोल नाका आजपासून सुरू होणार आहे. तर, दुसरीकडे टोलविरोधी कृती समितीने आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. सिंधुदुर्ग पासिंग वाहनांना टोल माफीतून सूट देण्याची मागणी, या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांचा आणि जनतेचा टोल वसुलीला असलेला तीव्र विरोध लक्षात घेऊन आजपासून काढण्यात आलेला टोलवसुलीचा मुहूर्त पुढे ढकलण्यात आला होता. मागील वर्षी जून महिन्यात टोल वसुली करण्यात येणार होती.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कणकवली ओसरगाव येथील टोल नाका आज सकाळपासून सुरू होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांना टोल माफी मिळाल्याखेरीज ओसरगाव टोल नाका सुरू होऊ देणार नाही असा इशारा सर्वपक्षीयांनी दिला आहे. त्यामुळे टोल नाका सुरू होणार की नाही याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
ओसरगाव टोल नाक्यावर 14 जूनपासून टोल वसुली सुरू केली जाणार आहे. यात सिंधुदुर्ग पासिंगच्या नोंदणीकृत व्यावसायिक वाहनांसाठी शुल्कात 50 टक्के सवलत असणार आहे. तर खासगी अव्यावसायिक वाहनांना महिन्यासाठी 330 रुपयांचा पास असणार आहे. टोलनाका सुरू होत असल्याची अधिसूचना महामार्ग प्राधिकरणातर्फे आज प्रसिद्ध करण्यात आली.