(रत्नागिरी)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले समुद्रकिनारी भागात तेरेखोल खाडीसमोर अंदाजे २३ ते २४ मी खोल पाण्यात दुर्मिळ लेदरबॅक कासव सापडल्याची नोंद करण्यात आली आहे. वेंगुर्लेचे सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी रुपेश म्हाकले यांनी याबाबत माहिती दिली.
आतापर्यंत महाराष्ट्रातील किनारी भागात तिसरी नोंद झाली आहे. यापुर्वी १९८५ साली देवबाग, मालवण किनार्यावरुन साडेचार फूट लांब असे लेदरबॅक कासव मिळाल्याचे केंद्रिय सागरी मत्स्य संशोधन संस्थेने नमूद केले होते. त्यानंतर तब्बल ३४ वर्षांनी मे २०१९ रोजी रायगड जिल्ह्यातील भरडखोल मधून पहिल्यांदा व मार्च २०२१ रोजी डहाणूतील नारपाडा भागातून दुसर्यांदा या दुर्मिळ कासवाच्या प्रजातीची नोंद झाली होती. जगभरात मिळणार्या ७ समुद्री कासवांच्या प्रजातींपैकी ५ प्रजाती या महाराष्ट्रात आढळतात. त्यामध्ये लेदरबॅक कासव हे मुख्यतः अंदमान व निकोबार बेटांवर त्यांची घरटी करत असल्याचे सर्वश्रुत आहे.
या कासवांची उंची साधारण ५ ते ७ फुट एवढी असून जगातील सर्वात मोठी कासवाची प्रजात म्हणून ओळखली जाते. ही कासवे मुख्यतः जेलीफिश या समुद्री जीवांवर आपला उदरनिर्वाह करतात व त्याकरिता ते लांब स्थलांतर देखील करतात. भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा (परिशिष्ठ ख भाग २) याच्या अंतर्गत सर्व समुद्री कासवांना अत्यंत कडक संरक्षण देण्यात आले आहे. जागतिक स्थरावर देखील सागरी कासवाची ही विशिष्ट प्रजाती आंतरराष्ट्रीय प्रकृति संरक्षण संघाच्या धोक्यात असलेल्या प्रजातींच्या लाल यादीमध्ये असुरक्षित म्हणून सूचीबद्ध आहे. त्यांचा अरबी सागरातील अधिवास हा नेहमीच एक रहस्याचा विषय संशोधकांकारिता राहिला आहे.
ऑलिव्ह रिडले कासवे महाराष्ट्राच्या काही किनारी जिल्ह्याच्या भागात अंडी देण्याकरिता येतात त्यांच्या संरक्षण व संवर्धनाकरीता कासव संवर्धन मोहीम स्थानिक लोक व काही स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने राबविण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे संशोधन संस्थांच्या माफत समुद्री कासवांच्या संवर्धनसाठी वेगवेगळ्या प्रकल्पांची उभारणी करून महत्त्वपूर्ण कामे अंमलात आणण्यासाठी कांदळवनकक्ष नेहमीच कार्यरत आहे.
गेल्या काही वर्षांमधे १६१ ऑलिव्ह रिडले कासवे, ७४ ग्रीन सी कासवे, ५ हॉक्सबिल कासवे व २ लेदरबॅक कासवे मच्छिमारांनी त्यांच्या जाळ्यातून सोडली असून त्याकरिता त्यांना सुमारे ३३ लाख ५८ हजार ३५० रुपयांचे एवढे अनुदान प्राप्त झाले आहे.