(रत्नागिरी)
पाटगावचे सुपुत्र, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी अप्पर कोषागार अधिकारी श्री.राम मेस्त्री यांना सृजन वाचन व साहित्य सांस्कृतिक मंच सरवडेद्वारा कोल्हापूरमार्फत राज्यस्तरीय सृजन साहित्य जीवनगौरव पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
कोल्हापुरचे आमदार संपत पवार यांच्या हस्ते श्री. राम मेस्त्री यांना सदरचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. लेखक महेश काणेकर, बालसाहित्यिक बाबुराव शिरसाट, सौ.अनुराधा मेस्त्री, आदिराज द्विविजय मेस्त्री आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. श्री. राम मेस्त्री यांची प्रदीर्घ साहित्यिक कारकीर्द असून आतापर्यंत त्यांनी 30 पुस्तकांचे लेखन केले आहे. 18 ते 20 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. इयत्ता नववीपासून श्री. राम मेस्त्री यांचे साहित्य प्रकाशित होत आहे.
विविध नियतकालिके, आकाशवाणी, पुस्तकरूपी श्री. राम मेस्त्री यांचे विविधांगी साहित्य प्रकाशित, प्रसारित झालेले आहे. कथा, लघुकथा, कविता, ललित लेख, वैचारिक लेख, कादंबरी, पर्यटन, कृषी, गौरवग्रंथ, नभोनाट्य, लोकनाट्य, एकांकिका, नाटक, विभुती कथा, महापुराण अशा विविध क्षेत्रात श्री. राम मेस्त्री यांनी समर्थपणे संचार केला आहे. सुमारे 100 कथांचे दहा कथासंग्रह घेण्याचे भाग्य श्री. राम मेस्त्री यांना मिळाले आहे. सदर पुरस्काराबद्दल श्री. राम मेस्त्री यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.