(चिपळूण / प्रतिनिधी)
तालुक्यातील सावर्डे बाजारपेठेतील पाच दुकाने चोरट्यांनी फोडल्याची घटना बुधवारी (९ ऑगस्ट) मध्यरात्री २ वाजता घडली. पाचही दुकानाचे शटर उचकटून रोख रक्कम व एक ग्राम सोन्याचा अंश असलेले दागिने लंपास करत चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. हे चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले असून, तीन वेगवेगळी फुटेज सावर्डे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
सावर्डे पोलिस स्थानकात व्यापाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर होलसेल किराणा व्यापारी रुपेश खेडेकर, तसेच डेरवण रस्त्यावरील दीपक सावर्डेकर व साजन कुरुसिंगल याचे फ्रेण्डस सुफर बझार, त्याच्या समोर असणारे केदारनाथ हार्डवेअर, तसेच ओंकार ज्वेलरी, लॉजमध्ये चोरी झाली. दुकानाच्या शटरची लोखंडी पट्टी कापून चोरट्यांनी दुकानांमध्ये प्रवेश केला. साधारण २५ ते ३० वयोगटातील हे तरुण आहेत. सीसीटीव्ही फुटेजमुळे संबंधित चोरट्यांची ही ओळख पटण्यास मदत होणार आहे.
सावर्डे बाजारपेठेतील रुपेश खेडेकर याचे किराणा होलसेल व्यापारी असून, त्यांच्या दुकानातील ७ हजाराची नाणी व स्वरूप विजय खेडेकर याच्या ओंकार ज्वेलर्स दुकानातील एक ग्राम सोन्याचे अंश असलेले ३० हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले आहेत.
पाचही दुकानाचे शटर चोरट्यांनी उचकटून टाकल्याने दुकानदारांचे नुकसान झाले आहे. याबाबत सावर्डे पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक जयंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रदीप गमरे करीत आहेत.