(जाकादेवी / संतोष पवार)
२६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून कवठेमहाकाळ येथील भारतीय संविधानाचे अभ्यासक व विचारवंत नितीन चंदनशिवे यांचे रत्नागिरी शहरातील सावरकर नाट्यगृहामध्ये २६ रोजी सकाळी ११ते दु. २ या वेळेत “भारतीय संविधान व आजची स्थिती” या महत्वपूर्ण विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण असे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
भारतीय संविधान व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समिती रत्नागिरी व भारतीय बौद्ध महासभा तालुका रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. सदरचा कार्यक्रम संयुक्त समितीचे धडाडीचे व उपक्रमशील अध्यक्ष प्रकाश रामचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी बौद्धजन पंचायत समिती व भारतीय बौद्ध महासभा संयुक्त कार्यक्रम समितीचे उपाध्यक्ष तुषार जाधव, सचिव विजय मोहिते, सहसचिव सुहास कांबळे, कोषाध्यक्ष नरेंद्र आयरे, दोन्ही संस्थांचे व संयुक्त कार्यक्रमाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य आणि रत्नागिरी तालुक्यातील सर्व गाव शाखा व आंबेडकरी विचारधारेच्या विविध संस्था, संघटना प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
तरी आंबेडकरी चळवळीतील अनेक अभ्यासक , कार्यकर्ते व नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समिती व भारतीय बौद्ध महासभा संयुक्त कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश रामचंद्र पवार यांनी केले आहे. प्रारंभी रत्नागिरी शहरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार समर्पित करून संविधान दिनाचा गौरव करण्यात येणार आहे.