(देवरुख)
सावरकर चौक देवरूख येथे जनतेला न जुमानता नियमबाह्य बांधकाम सुरू असल्याचे दिसून येत आहे. सदर बांधकाम रस्त्यालगत असून चौक असल्याने रहदारी जास्त असते, त्यामुळे वाहतुकीला आणि रहदारीला अडथळा निर्माण होण्याचा संभव आहे. सदर बांधकाम शासकीय विभागाद्वारे असून रस्त्यापासून जागा सोडणे आवश्यक आहे. तरी सदर बांधकाम आपल्या अखत्यारीतील योग्य जागा नियमात बसेल अशी बघून जे प्रयोजन आहे, ते पूर्णत्वास न्यावे. 2020 पासून छ.शिवाजी महाराज चौक येथे जिल्हा परिषदने जागा दिली असूनही महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ.शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात दिरंगाई होत आहे. त्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रत्यन करणे आवश्यक असताना दुर्लक्ष होत आहे असे दिसते.
पुतळा उभारण्याबाबत अनेक महिन्यापूर्वी पत्रव्यवहार करण्यात आला होता, त्यालाही कचऱ्याची टोपली दाखविण्यात आली असून त्याचे उत्तरही देण्याची क्षमता दाखविण्यात आली नाही. यावरून छ.शिवाजी महाराज यांचेबद्दल प्रशासनाला आस्था नसल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.
चोरपऱ्या येथेही नाहक खर्च करून हायड्रोकॉलनीकडे जाताना नाळा बुजवून समतोल करण्याचा प्रयत्न केला गेला असून ते काम अनेक महिन्यापासून थांबविण्यात आलेले आहे. अशा बांधकामाबाबत स्थानिक प्रशासनाकडे निवेदन वजा अर्ज मेलद्वारे दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याबाबत वरिष्ठ अधिकारी यांना भेट देऊन अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार आहे असे सामाजिक कार्यकर्ते, महाराष्ट्र समविचारी मंच रत्नागिरीचे व माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ मुंबईचे संगमेशर तालुका अध्यक्ष मनोहर गुरव यांनी सांगितले.