(रत्नागिरी)
भाजपा-शिवसेने तर्फे बुधवार दिनांक १२ एप्रिल २३ रोजी आयोजित सावरकर गौरव यात्रेनिमित्त जे जाहीर आवाहन करण्यात आलेले आहे, त्या आवाहनातील मजकूर अर्धसत्य असून वस्तुस्थितिला धरून नाही. असा आरोप रूपेंद्र पुंडलीक शिवलकर अध्यक्ष, रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघ व कुमार वामन शेट्ये, माजी सभापती पंचायत समिती, रत्नागिरी यांनी केला आहे. त्यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात नमूद केले आहे की, वीर सावरकर यांनी स्पृश्य अस्पृश भेदभाव मिटवण्याचे कार्य हाती घेतल्यानंतर रत्नागिरीतील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरामध्ये सर्व हिंदू बांधवांची एकत्रीत बैठक आयोजित केली आणि त्या बैठकित स्पृश्य / अस्पृश्य भेदभाव मिटवण्याचा संकल्प सर्वांसमोर मांडला असता, त्यावेळी काही कर्मठं लोकांनी त्यांच्यावर दगडांचा वर्षाव केला आणि, त्यांना रक्तबंबाळ केले होते. हाती घेतलेले कार्य पुढे कसे न्यायचे हा मोठा यक्षप्रश्न वीर सावरकर यांच्यासमोर होता. त्याच वेळी त्यांना काही कार्यकर्त्यांनी असे सूचवले की, एक व्यक्ती आहे की जिच्या शब्दामध्ये प्रचंड वजन आहे. आणि त्यांना कोणी ही विरोध करु शकत नाही. वेळ प्रसंगी ते नवीन मंदिर बांधून त्यामध्ये स्पृश्य अस्पृश्यांना प्रवेश देवू शकतात. ती व्यक्ती म्हणजेच श्रीमान भागोजीशेठ कीर होय.
वीर सावरकर यांनी श्रीमान भागोजीशेठ कीर यांना विनंती केल्यावरून शेठजींनी २० गुंठे जागा मुँह बोली रकमेमध्ये खरेदी करून दोन वर्षामध्ये सुमारे दीड लाख रुपये खर्च करून देशातील पहीले पतित पावन मंदिर उभारले आणि त्या ठिकाणी २३ फेब्रुवारी १९३१ रोजी पहीले सहभोजन घडवले. त्यानंतर सलग १३ वर्षे भागोजीशेठ कीर यांनी पतितपावन मंदिर येथे सहभोजन व सहभजन नित्यनेमाने सुरु ठेवले होते.
२४ फेब्रुवारी १९३१ रोजी श्रीमान भागोजीशेठ कीर यांचे निधन झाल्यानंतर हे सहभोजनाचे कार्य बंद पडले. ते आजतगायत बंद होते. त्यावेळी कोणत्याही महापुरुषाच्या हातून हे कार्य घडू शकले नाही. त्यामुळे पतितपावन मंदिराच्या उभारणीमध्ये संपूर्ण योगदान भागोजीशेठ कीर यांचेच होते. आणि स्पृश्य अस्पृश्य यांना एकत्र आणुन त्यांना सहभोजन घालण्याची त्याकाळी ताकद भागोजीशेठ यांच्याकडेच होती. जर ती इतर कोणामध्ये असती तर ते सहभोजन भागोजीशेठ यांच्या पश्चात कोणालाही सुरु ठेवता आले असते. त्यामुळे आयोजकांनी सहभोजनाचा उपक्रम वीर सावरकरांनीच सुरू केला असे म्हणणे उचित होणार नाही. पतिपावन मंदिर सर्वांसाठी कोणी खुले केले याचा शिलालेख मंदिराच्या प्रवेशद्वारावर २४ फेब्रुवारी १९३१ साली लिहीलेला आहे तो पंडित आणि पटवर्धन यांनी वाचून घ्यावा असे आवाहन रूपेंद्र पुंडलीक शिवलकर, अध्यक्ष, रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघ व कुमार वामन शेट्ये माजी सभापती पंचायत समिती, रत्नागिरी यांनी केले आहे.