(मुंबई)
हल्ली सर्व ऑनलाईन व्यवहार झाले आहेत. त्यामुळे अधिकाधिक सुविधांच्या दृष्टीने नवनवीन अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. काही अॅपवरून नुसतेच आमिष दाखविले जाते आणि अशा गोष्टींना अनेकजण बळी पडतात, भुलतात. जर बँक व्यवहारासाठी कोणतेही अॅप डाऊनलोड करण्यात येत असेल, तर सावधानता बाळगायला हवी. कारण सोवा मालवेअरमुळे तुमच्या बँक खात्यातील सर्व पैसे गायब होऊ शकतात, असा इशारा स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना दिला आहे.
अनावश्यक व धोकादायक असलेल्या अॅपच्या माध्यमातून हे वायरस तुमच्या फोनमध्ये प्रवेश करेल आणि तुमच्या डेटावर ताबा घेऊ शकेल, असे एसबीआयने सांगितले आहे. कॅनरा बँकेनेही त्यांच्या ग्राहकांना ही खबरदारीची सूचना दिली आहे. ही सूचना खासकरून सर्व अॅन्ड्राईड फोन धारकांसाठी आहे.
एसबीआयने दिलेल्या इशा-यानुसार, सोवा हे एक ट्रोजन मालवेअर आहे, जे बँकिंग अॅप्स वापरणा-या ग्राहकांच्या पर्सनल डेटावर डल्ला मारते. यासंबंधीची सर्व गुप्त माहिती चोरली जाते. ज्या वेळी तुम्ही तुमचे बँकिंग अॅप वापरत असाल, त्यावेळी हे मालवेअर क्रेडेंशियल्स रेकॉर्ड करते. एकदा का व्हायरस फोनमध्ये आला तर त्याला ओळखणे आणि बाहेर काढणे अवघड होऊन बसते.
सुरुवातीला एका फेक मॅसेजच्या माध्यमातून ट्रोजन मालवेअर तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल होते. त्यानंतर हे ट्रोजन तुमच्या सध्याच्या सर्व अॅप्सची माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचवते. नंतर हॅकर्स कमांड आणि कंट्रोलच्या माध्यमातून तुमच्या फोनमध्ये एक व्हायरस पाठवतो. त्याचसोबत एक यादीही पाठवली जाते, ज्यामध्ये टार्गेट करण्यात येणा-या अॅप्सची माहिती असते. जर या अॅप्सचा वापर केला तर व्हायरस त्याचा डेटा हा एक्सएमएल फाईलमध्ये स्टोअर करते, त्याचा अॅक्सेस हा हॅकर्सला सहज मिळतो.
अलिकडे आपल्याला बँक खात्याला कोणत्या ना कोणत्या इंटरनेटच्या माध्यमातून धोका पोहोचत असतो. तर ब-याचदा फोनवरून किंवा ऑनलाईन माहिती मागवून थेट बँक खात्यापर्यंत पोहोचायचे आणि खात्यातील रक्कम लंपास करायची, असे प्रकार सर्रास घडत आहेत. यातून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. आता व्हायरसच्या माध्यमातून ऑनलाईन फसवणूकही होत आहे. याचा फटका बँक ग्राहकांना बसत आहे. त्यामुळे बँकांनी आता ग्राहकांना अलर्ट करायला सुरुवात केली आहे.
व्हायरस, धोकादायक अॅप्स पासून सावध राहण्यासाठी बँका ग्राहकांना नियमित अलर्ट करीत असतात. सुरक्षेची खात्री असल्याशिवाय तुम्ही कोणतेही अॅप डाऊनलोड करू नका. अॅप डाऊनलोड करण्यापूर्वी त्याचा review वाचा, अॅप डाऊनलोड करताना तुम्ही कोणत्या गोष्टींना परवानगी देता याची खात्री करा, असेही एसबीआयने म्हटले आहे.