(नवी दिल्ली)
संरक्षण विभागाच्या गुप्तचर संस्थांनी चायनिज मोबाईलबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे. सुरक्षा यंत्रणांनी, सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांनी चिनी कंपन्यांचे मोबाईल वापरण्यापासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेवरुन चीनसोबत चाललेल्या चकमकीवरुन गुप्तचर यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. भारतीय सैनिकांनी चिनी मोबाईल वापरु नये, असा सल्ला वजा आदेश देण्यात आला आहे.
संरक्षण विभागाच्या गुप्तचर यंत्रणांच्या वतीने सांगण्यात आले आहे की, लष्करी तुकड्या आणि युनिट्सनी चिनी मोबाईल वापरु नये. शिवाय सैनिकांच्या कुटुंबातील सदस्यांनीही चिनी मोबाईलपासून दूर राहावे, असे सांगण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार देशाच्या सुरक्षा यंत्रणांनी चिनी मोबाईल वापरण्यावरुन एक अॅडव्हाजरी जारी केली आहे. काही मोबाईलमध्ये मॅलवेअर आणि स्पायवेअर आढळल्याची माहिती आहे. तर व्हीओ, ओप्पो, श्याओमी, वन प्लस, ऑनर, रियल मी, जेडटीई, जियोनी, आसुस, इन्फिनिक्स हे मोबाईल सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांनी वापरु नये, असे सांगण्यात आले आहे.