(मुंबई)
कोरोनाच्या पूर्वीच्या व्हेरिएंटपेक्षा वेगाने पसरणाऱ्या Covid JN.1 या नव्या व्हेरिएंटचा रुग्ण ठाण्यात आढळल्याने राज्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. ठाण्यातील कळवा रुग्णालयात कोरोनाचा नवा व्हेरिएंटचा रुग्ण आढळला आहे. कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट जेएन-१ ने पुन्हा एकदा जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. केरळमध्ये तर एकाच दिवशी जेएन.१ या सब व्हेरिअंटचे ११५ रुग्ण आढळल्याने केंद्र सरकारने राज्यांसाठी मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत. या व्हेरिएंटने केरळमध्ये पाच जणांचा बळी घेतला आहे. तर देशात गेल्या काही दिवसांत कोरोनामुळे पाचहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
JN.1 हा कोविडचा सबव्हेरिएंट वेगाने पसरतो तसेच प्रतिकार शक्ती भेदून व्यक्तीच्या शरीरात जलदगतीने प्रवेश करतो अशी माहिती नॅशनल इंडियन मेडिकल असोसिएशनने दिली आहे. कोव्हिडचा JN.1 हा नवीन व्हेरिएंट पूर्वीच्या XBB या व्हेरिएंटपेक्षा वेगळा असून पूर्वी कोविड संसर्ग झालेल्या लोकांना तसेच लसीकरण झालेल्यांनाही याचा संसर्ग होऊ शकतो, असेही म्हटले जात आहे. गेल्या दोन वर्षानंतर राज्यात कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. केरळ अन्य राज्यानंतर आता महाराष्ट्रातही कोरोनाचे पुनरागमन झाले आहे.
मंगळवारी सायंकाळी ठाणे महापालिका हद्दीत एक १९ वर्षीय तरुणीला कोरोनाची लागण झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे.कोरोनाची लागण झालेल्या तरुणीवर ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. या तरुणीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहितीही समोर आली आहे. तसेच या रुग्णाचे नमुने तपासणीसाठी एनआयव्ही पुणे येथे पाठविण्यात येत आहेत. या अहवालानंतर कोरोनाचा कोणता व्हेरिएंट आहे, हे अधिक स्पष्ट होणार आहे.