(नवी दिल्ली)
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने महाठग सुकेश चंद्रशेखरचा समावेश असलेल्या २०० कोटी रुपयांच्या बेकायदेशीर सावकारी प्रकरणात तिच्याविरुद्धचा गुन्हा रद्द करण्याची मागणी करीत दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या आठवड्यात जॅकलिनच्या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. याचिकेत ईडीने या प्रकरणात दाखल केलेले दुसरे पुरवणी आरोपपत्र आणि येथील कनिष्ठ न्यायालयासमोर प्रलंबित असलेली संबंधित कार्यवाही रद्द करण्याची मागणी केली आहे.
जॅकलिनने याचिकेत युक्तिवाद केला आहे की, अवैध मार्गाने कमावलेल्या संपत्तीची बेकायदेशीर सावकारी करण्यात तिचा सहभाग होता, असे कोणतेही संकेत नाहीत. त्यामुळे तिच्यावर बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ आणि ४ अंतर्गत गुन्हा दाखल करता येणार नाही. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ज्या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता, त्या गुन्ह्यात तिला फिर्यादी साक्षीदार म्हणून हजर करण्यात आल्याचे जॅकलिन फर्नांडिसने सांगितले. त्या प्रकरणी तिचे म्हणणेही नोंदवण्यात आले आहे.
ईडीने जॅकलीन विरोधात 200 कोटी प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आता तिने हे सर्व गुन्हे आणि इतर चार्जशीट रद्द करण्याचं आव्हान दिल्ली न्यायालयाला दिलं आहे. सुकेश चंद्रशेखर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केलेल्या अपराधाबद्दल तिला काहीही माहीत नव्हतं, असं याचिकेत स्पष्ट करण्यात आलं आहे. जॅकलीन कुठल्याही गुन्ह्यात सहभागी नव्हती, असंही म्हटलं गेलं आहे. आता याप्रकरणात पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सुकेश चंद्रशेखरसोबत मैत्री झाल्यानंतर त्याने जॅकलीनला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. त्याने जॅकलीनवर तब्बल सात कोटी रुपये खर्च केले होते. महागडी ज्वेलरी, चार पर्शियन मांजरी, 57 लाख रुपयांचा घोडा असे सगळं गिफ्ट केलं होतं. त्याचप्रमाणे जॅकलिनच्या बहिणीलादेखील त्याने महागडे गिफ्ट दिले होते. जॅकलिनच्या आई वडिलांनादेखील त्याने पोर्शे आणि मर्सिडीज या कारही भेट दिल्या होत्या. यांची किंमत 2 कोटींच्या पुढे आहे.
जॅकलिनच्या वतीने तिचे वकील प्रशांत पाटील हे तिची बाजू लढत आहेत. जॅकलिनला सुकेशबाबत काहीही माहीत नाही. तो काय करतो तेदेखील तिला ठाऊक नाही. जॅकलिनला सुकेशने हे सांगितलं होतं की तो मोठा व्यावसायिक आहे. जॅकलिन स्वतःच या प्रकरणातली पीडित आहे असंही प्रशांत पाटील यांनी म्हटलं आहे.