(पुणे)
आपल्या भाचीच्या लग्नासाठी तसेचच हाॅटेलच्या दुरुस्तीकरिता एका व्यवसायिकाने पाच टक्के दराने तीन लाख ९० हजार रुपये सावकारी करणाऱ्या ओळखीच्या इसमाकडून उधार घेतले हाेते. त्याबदल्यात त्यास ११ लाख रुपयांची परतफेड करुनही आणखी दीड लाख रुपये थकीत व्याजाचे मागून त्रास देणाऱ्या व्यक्तीवर पाेलीसांनी महाराष्ट्र सावकारी अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
अमरजित सिंग रंधवा (रा.कळस,पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आराेपीचे नाव आहे. याप्रकरणी रविराज तिम्यया शेट्टी (४९,रा.धानाेरी,पुणे) यांनी विश्रांतवाडी पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शेट्टी यांनी एप्रिल २०१६ पासून आतापर्यंत अमरजित रंधवा यांच्याकडून घर खरेदी करण्याकरिता, भाचीच्या लग्नाकरिता तसेच हाॅटेलची दुरुस्ती करण्यासाठी वेळाेवेळी एकूण तीन लाख ९० हजार रुपये पाच टक्के दराने कर्ज घेतले हाेते.
त्यानुसार शेट्टी हे रंधवा यांना दर महिना १९ हजार ५०० रुपये प्रमाणे व्याजाचे डिसेंबर २०२१ पर्यंत सुमारे ११ लाख रुपये दिले. मात्र, त्यानंतर शेट्टी यांच्याकडे पैसे नसल्याने ते आराेपीस व्याजाचे पैसे देवु शकले नाहीत. त्यामुळे त्याने एक ते दाेन वेळा तक्रारदार याचे राहते घरी येवून तसेच अनेकवेळा त्यांचे हाॅटेलवर येवून व वारंवार शेट्टी यांना फाेन करुन थकीत दीड लाख रुपये व्याजाचे पैसे मागणी करत पैशांचा सतत तगादा लावून त्रास दिला. याप्रकरणी पाेलीस अधिक तपास करत आहे.