(रत्नागिरी)
रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथील कचरा आता खऱ्या अर्थाने धुमसू लागला आहे. सारेजण आता या प्रश्नाकडे लक्ष घालताना दिसत आहेत.
साळवी स्टॉप येथील डंपिंग ग्राउंडचा प्रश्न आता जटील बनला आहे. कचऱ्याला वारंवार आग लावली जात असल्याने या परिसरामध्ये धुराचे साम्राज्य पसरून प्रचंड प्रदूषण होते. वयोवृद्ध आणि बालकांना खोकला, दम्यासारखे आजार होऊ लागले आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी तेथील उद्योजक सौरभ मलुष्टे, नगरसेविका शिल्पा सुर्वे, पुजा दीपक पवार, काव्या कामतेकर, यांनी पुढाकार घेतला आहे. पालिका प्रशासकांना भेटून तेथे कायमस्वरूपी कर्मचाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन बंब दिला जाणार आहे. आग लावणारा सापडल्यास त्याच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी या शिष्टमंडळाने पालिकेकडे केली
आहे.
पालिकेला घनकचरा प्रकल्पासाठी जागाच उपलब्ध होत नसल्याने डंपिंग ग्राउंडमधील कचऱ्याचे साम्राज्य वाढतच चालले आहे. शहरात दरदिवशी सुमारे २० ते २२ टन कचरा निघतो. त्याचे विघटन करून तो या डंपिंग ग्राउंडवर टाकला जातो. या कचऱ्यावर प्रक्रिया करून तेथे खतनिर्मिती केली जात होती; परंतु ही प्रक्रियादेखील बंद पडली आहे.
डंपिंग ग्राउंडमधील कचऱ्याला वारंवार आग लागते. कचरा साठून राहिल्याने तेथे मिथेनॉल वायू तयार होऊन प्रखर उन्हात कचऱ्याला आग लागते, असे पालिका प्रशासनाकडून वारंवार सांगितले जाते. मात्र त्याचा कोणताही पुरावा पालिकेकडे नाही. मात्र या सर्व प्रकारामुळे कचऱ्याला आग लागली की ती धुमसत राहते. यामुळे परिसरात धुराचे साम्राज्य पसरते. या प्रदूषणकारी धुरामुळे तेथील नागरिक हैराण झाले आहेत.
उद्योजक सौरभ मलुष्टे, नगरसेविका शिल्पा सुर्वे, पुजा दीपक पवार, काव्या कामतेकर, यांनी पालिकेच्या प्रशासन अधिकाऱ्यांसह आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन त्यांनी डंपिंग ग्राऊंडला भेट दिली. तेव्हा आग लागली नाही तर लावली जाते, असे प्रथमदर्शनी दिसून आले. हे रोखण्यासाठी पालिकेने २४ तास कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आश्वासन दिले आहे. या दरम्यान आग लावणारी व्यक्ती सापडल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. तसेच आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन बंब देण्यात येणार आहे. यामुळे धूर आणि प्रदूषण रोखणे शक्य होणार आहे. मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी याबाबत पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.