(रत्नागिरी / प्रतिनीधी)
रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलनाच्या प्रचार, प्रसारासाठी शुक्रवारी दि. ६ जानेवारीला नगर प्रदक्षिणा सायकल फेरीचे आयोजन केले आहे. रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, दापोली, चिपळूण, खेड सायकल क्लबतर्फे हे संमेलन रत्नागिरीच्या अंबर हॉलमध्ये रविवारी ८ जानेवारीला दिवसभर होणार आहे. यामध्ये आतापर्यंत १७५ जणांनी नोंदणी केली असून रत्नागिरी जिल्ह्यासह महाराष्ट्र व देशातूनही नामवंत सायकलपट्टूंनी नोंदणी केली आहे.
सामान्य सायकल चालवणाऱ्या व्यक्तींनीही यात सहभाग व्हावे या हेतूने नगर प्रदक्षिणा राईड होणार आहे. उद्या सायंकाळी ७ वाजता शहरातील मारुती मंदिर सर्कलपासून नगर प्रदक्षिणा राईडला सुरवात होणार आहे. सायकलिस्ट क्लबचे सर्व सदस्य यात सहभागी होणार शहरातील जास्तीत जास्त सायकलस्वारांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन सायकलिस्ट क्लबने केले आहे.
हे संमेलन सर्व वयोगटातील महिला, पुरुष, मुले व नियमित सायकल चालवायची इच्छा असणाऱ्यांसाठी खूपच मार्गदर्शक ठरणारे आहे. त्यामुळे अजूनही नोंदणी करावी. सायकल संमेलनाच्या नोंदणी किंवा अधिक माहितीसाठी दर्शन : 99703 98242, योगेश : 99203 76184 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने केले आहे.
नगरप्रदक्षिणेचा मार्ग
मारुती मंदिर, हिंदू कॉलनी, लँडमार्क हॉटेल, माळनाका, जयस्तंभ, राम आळी, गोखले नाका, काँग्रेस भुवन, बंदर रोड येथून ग्रामदैवत श्री भैरी मंदिरात सायकल सवारी पोहोचेल. तेथे श्री भैरी बुवाचे आशीर्वाद आणि संमेलन यशस्वीतेसाठी प्रार्थना करण्यात येणार आहे. त्यानंतर मांडवी, सी फॅन्स हॉटेल येथून वळून काँग्रेस भुवन, टिळक आळी, जोशी पाळंद, पतितपावन मंदिर, मारुती आळी, एसटी स्टॅन्ड, जेल रोड, शिवाजीनगर, साळवी स्टॉप, नाचणे रोड मार्गे पुन्हा मारुती मंदिर येथे सायकल फेरीची सांगता होणार आहे.