(मेलबर्न)
भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्जा ऑस्ट्रेलियन ओपनमधील शेवटचा सामना खेळल्यानंतर भावूक झाली होती. तिने तिचा जोडीदार रोहन बोपण्णासोबत मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पण फायनलमध्ये ही भारतीय जोडी पराभूत झाली. या सामन्यानंतर सानियाने टेनिसला अलविदा केला आहे. त्यामुळे अखेरच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत तिचे ग्रँडस्लॅम जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले. विजेतेपदाच्या लढतीत भारतीय जोडीला ब्राझीलच्या लुईसा स्टेफनी आणि राफेल मॅटोस यांनी ६-७, २-६ ने पराभूत केले. यावेळी सानियाला रडू कोसळले होते. ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीत पराभूत झाल्यानंतर सानिया मिर्जा भावूक झाली होती.
माझ्या व्यावसायिक करिअरची सुरुवात मेलबर्नमध्ये २००५ साली झाली. ग्रँडस्लॅम कारकिर्दीला निरोप देण्यासाठी यापेक्षा चांगली जागा असूच शकत नाही, असे ती म्हणाली. सानिया मिर्जा दुहेरी टेनिस स्पर्धेत ३ वेळा चॅम्पियन ठरली. यामध्ये तिने २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचे महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले. तसेच महिला दुहेरीत २०१५ मध्ये विम्बल्डन आणि यूएस ओपनचे विजेतेपद पटकावले होते. टेनिस कारकिर्दीत तिला एकेरीत एकही ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकता आले नाही. परंतु एकेरीशिवाय तिने ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि यूएस ओपन दुहेरी आणि मिश्र दुहेरीमध्ये विजेतेपद पटकावले.
सानिया मिर्जाने २००९ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचे मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते. यानंतर २०१२ मध्ये फ्रेंच ओपनचे मिश्र दुहेरी जिंकले, तर २०१४ मध्ये तिने यूएस ओपनचे विजेतेपद पटकावले होते. यापूर्वी सानिया मिर्जाने ऑस्ट्रेलियन ओपन २०१३ हे तिचे शेवटचे ग्रँडस्लॅम असल्याचे स्पष्ट केले होते. आता तिने केलेल्या सोशल मीडिया पोस्टमधून अधिकृतरित्या निवृत्ती जाहीर केली आहे.