(मुंबई)
उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा एक धक्का बसला असून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तृष्णा विश्वासराव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. तृष्णा विश्वासराव या माजी सभागृह नेत्या आणि ७ वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. यावेळी आमदार सदा सरवणकर आणि आमदार मनीषा कायंदे आदि उपस्थित होते.
तब्बल सात वेळा मुंबई महानगरपालिकेवर निवडून आलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका सौ.तृष्णा विश्वासराव यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांची #शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांची… pic.twitter.com/maRYdswT93
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 25, 2023
प्रवेश करताच तृष्णा यांची उपनेते पदी वर्णी करत असल्याची घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धती आणि कष्ट करून काम करण्याची पद्धत आवडल्याने आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केला असल्याचे तृष्णा विश्वासराव यांनी यावेळी सांगितलं. यापुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी एकनिष्ठ राहून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्या म्हणाल्या. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम पाहिले आहे. इर्शाळवाडीमध्ये पहाटे पोहचून ५ तास डोंगर चढून गेले. तेथील अनाथ मुलांना त्यांनी दत्तक घेतले. म्हणून प्रभावित होऊन मी पक्षप्रवेश करत आहे, असं तृष्णा विश्वासराव यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, तृष्णाताई या तब्बल सात वेळा निवडून आल्या आहेत आणि आज शिवसेनेत पक्ष प्रवेश करत आहेत, त्यांचे नाव अभिमानाने घेतले जाते. वर्षभरपूर्वी आपण भाजप-शिवसेना युतीचे सरकार स्थापन केले आणि लोकांच्या मनातील सरकार स्थापन केले. निवडणुकांवेळी सरकार स्थापन होताना गणितं बिघडली, ती गणितं आम्ही वर्षभरपूर्वी सुधारून सरकार स्थापन केलं.