(रत्नागिरी)
गुंतवलेली रक्कम ७ पटीने प्रॉफिट देऊन परतावा मिळेल, असे आमिष दाखवून तब्बल ६२ लाख ४६ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या दोघांच्या शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. फसवणुकीची ही घटना २२ फेब्रुवारी ते २९ एप्रिल २०२३ या कालावधीत घडली होती.
संजय आण्णासाहेब कांबळे (४४, मूळ रा. संगमनेर, अहमदनगर, सध्या रा. खेड, पुणे) आणि सोमनाथ चांगदेव सातपुते (४०, मूळ रा. संगमनेर, अहमदनगर, सध्या रा. खेड, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात समीर सुरेश प्रसादे (४२, रा. सिद्धिविनायकनगर, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, संशयितांनी संगनमताने फिर्यादीला वेल्थ पासवर्ड ३१४१ या व्हॉटस्ॲप ग्रुपवर समाविष्ट करून घेतले होते. या ग्रुपवर रजिस्ट्रेशन लिंक पाठवून त्यावर ट्रेडिंग अकाऊंट ओपन करण्यास सांगितले. फिर्यादी यांनी त्यांची पत्नी सिया प्रसादे हिच्या नावे कंपनीचे ट्रेडिंग अकाऊंट ओपन केले. त्यानंतर फिर्यादींनी गुंतवलेली रक्कम ही ७ पटीने प्रॉफिट देऊन परतावा दिला जाईल, असा प्लॅन त्यांना सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. नमूद लिंकचा वापर करून फिर्यादीची पत्नी सिया प्रसादेच्या बँक खात्यावरून यूपीआयआयडी आरोपींना आयएमपीएस तसेच सेव्हिंग अकाऊंटवर वेळोवेळी असे एकूण ६२ लाख ४६ हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर केले. परंतु त्यानंतर फिर्यादीला कोणताही परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
शहर पोलिसांनी दोन्ही संशयितांना अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी २० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत केली.