(संगमेश्वर / प्रतिनिधी)
तब्बल साडेतीनशे वर्षांची ऐतिहासिक गणेशोत्सवाची परंपरा लाभलेल्या देवरुखातील वरची आळी येथील जोशी कुटुंबीयांच्या गणेशाच्या चौसोपी वाड्यात उत्साहात उत्सव साजारा केला जात आहे. मोरगावच्या मयुरेश्वराप्रमाणे साजरा होणारा गणेशोत्सव आजही नव्या पिढीतील जोशी कुटुंबीय उत्साहाने साजरा करत आहेत.
जोशी घराण्याचे मुळचे बाबा जोशी गृहस्थीत असताना त्यांना एका असाध्य आजाराच्या व्याधीने पछाडले. असंख्य उपचारानंतरही गुण न आल्याने त्यांनी मोठ्या कठोरतेने संपूर्ण कुटुंबाचा त्याग करून नजीकच्या देव-धामापुरातील श्री देव शंकराच्या देवळात राहण्यास गेले आणि देवाची सेवा करू लागले. त्यांना तू तेथे राहू नकोस मोरगावला जा आणि मयुरेश्वराची सेवा कर असा दृष्टांत झाला. यानंतर असाध्य शारीरिक त्रास होत असूनही त्यांनी मोरगाव गाठले आणि मयुरेश्वराची तपश्चर्या केली. त्याप्रसंगी ते राहत असलेल्या देवळाच्या खोलीतील ओटीवर खोदाई कर आणि जे काही मिळेल, ते घरी घेऊन जा असा पुन्हा दुसरा दृष्टांत दिला.
याप्रमाणे बाबा जोशी यांनी खोदाई केली असता त्यांना चांदीच्या डब्यात चांदीची श्री सिद्धिविनायकाची उभ्या स्थितीतील उजव्या सोंडेची चार इंच उंचीची मूर्ती मिळाली. या मूर्तीच्या उजव्या हातात पारा आहे. मागील डाव्या हातात परशू, पुढच्या हातात दंड तर डाव्या हातात मोदक आहे. डोक्याला मुकुट आहे. पितळी सिंहासनावर कमळामध्ये मूर्ती उभी असून सिंहासनाच्या दोन्ही बाजूला सिंह, त्यावर पाचकणी नागाचे छत्र आहे. सिंहासन ८ इंच उंचीचे आहे. ज्या चांदीच्या डब्यात मूर्ती मिळाली तो डबाही आजही पुजेपुढे पाहावयास मिळतो. मूर्ती मिळाल्यावर बाबा जोशींना दृष्टांत झाला की, मूर्ती घरी घेऊन जा आणि उत्सव कर. याप्रमाणे बाबांनी देवरुखचे घर गाठले आणि पूर्ण बरे होऊन बाबा आल्याचे पाहून कुटुंब भारावून गेले. त्यांच्या आगमनाने आनंदोत्सोवातच बाबांनी गणेशोत्सवाची मोरगावच्या मयुरेश्व उत्सवाप्रमाणे दृष्टांतातून मिळालेल्या मूर्तीवर उत्सवाची परंपरा सुरू केली आणि ती आजपर्यंत नऊ पिढ्या अव्याहतपणे सुरू आहे.
भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला उत्सव सुरू
सर्वसाधारणपणे गणेश चतुर्थीला सर्वत्र गणेशोत्सव होतो. मात्र हा उत्सव भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला सुरू होतो आणि भाद्रपद शुद्ध पंचमीला उत्सवाची सांगता होते. या उत्सवकाळात श्रींची मूर्ती मोठ्या मिरवणुकीने शहरातील भोंदे यांच्या गणेश चित्रशाळेतून वाजत गाजत आणली जाते. द्वारपूजन, नृत्य, माध्यान्ह पुजन, नैवेद्य, भक्तांची सहस्त्रार्वतने, पुराण कीर्तन, असे कार्यक्रम होतात. षष्ठीला सत्यविनायक पूजा, हळदी-कुंकू व नवमीसह दशमीदिनी नवस मानवणे, नवस करणे असे कार्यक्रम होतात.