(संगमेश्वर)
देवरुखनजीक साडवली येथे सायकलस्वाराला चारचाकीने दिलेल्या धडकेत सायकलस्वार जागीच ठार झाला. हा अपघात सोमवारी सायंकाळी ५:१५ वाजता झाला. शोभित अनंत जाधव (२२, रा. निगुडवाडी, संगमेश्वर) असे तरुणाचे नाव आहे.
संगमेश्वर देवरुख मार्गावरून साडवलीच्या दिशेने सायकलवरून जात असताना शोभित जाधव याला देवरुखहून संगमेश्वरच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकी गाडीने जोराची धडक दिली. या धडकेत सायकलस्वार त्याच्या डोक्याला जोराचा मार लागला. त्याला देवरुख ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली.
अपघाताची माहिती मिळताच आई, वडील आणि अन्य नातेवाइक देवरुख ग्रामीण रुग्णालयात जमा झाले. शोभित अपघातात जागीच मृत झाल्याचे कळल्यानंतर त्यांनी हंबरडा फोडला. देवरुख पोलिस स्थानकाचे सहायक उपनिरीक्षक डी. एस. पवार, राहुल गायकवाड यांनी पंचनामा केला.
या अपघाताची बातमी वाऱ्यासारखी देवरूख परिसरात पसरताच सर्वांनी देवरूख ग्रामीण रूग्णालयाच्या दिशेने धाव घेतली.
सकाळी घरातून कामाला निघालेल्या शोभीतच्या अपघाताची माहिती निगुडवाडीत समजताच त्याचे आई-वडील व नातेवाईक देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. मात्र शोभीतचा मृतदेह पाहून त्यांनी एकच हंबरडा फोडला. शोभीतचा अपघातात मृत्यू झाल्याचे कळल्यानंतर निगुडवाडीतील अनेक ग्रामस्थांनी देवरूख ग्रामीण रूग्णालयात धाव घेतली. तर शोभीतच्या अपघाताची बातमी समजताच बेलारी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनीही देवरूख ग्रामीण रूग्णालयात गर्दी केली होती.