(देवरूख / वार्ताहर)
शिवसेना ठाकरे गट व युवासेना पुरस्कृत व श्री. प्रद्युम्न माने मित्रमंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य जिल्हास्तरीय फुटबाँल स्पर्धेचे उद्घाटन आज शनिवारी तहसिलदार अमृता साबळे यांच्याहस्ते साडवली येथे करण्यात आले. या भव्य जिल्हास्तरीय फुटबाँल स्पर्धेची पर्वणी संगमेश्वर तालुक्यातील फुटबाँलप्रेमींना अनुभवयास मिळणार आहे.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी माजी राज्यमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रविंद्रजी माने, युवानेते प्रद्युम्न माने, साडवली सरपंच राजू जाधव, सुरेश बने, निलेश भुवड, बळवंत नलावडे, बाबा साळवी आदि. मान्यवरांसह फुटबाँलप्रेमी उपस्थित होते. ही स्पर्धा साडवली येथील कै. मीनाताई ठाकरे विद्यालयाच्या मैदानावर दोन दिवस पार पडणार असून शालेय विद्यार्थी गट व खुला गट अशा दोन गटात ही स्पर्धा होणार आहे.
स्पर्धेतील प्रथम विजेत्या व द्वितीय उपविजेत्या संघास रोख रक्कम व आकर्षक चषक देवून गौरवण्यात येणार आहे. तसेच सामनावीर, बेस्ट गोल स्कोरर व बेस्ट गोल किपर अशी वैयक्तिक बक्षीसेही ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेदरम्यान रंगतदार सामने होत असून फुटबाँल सामन्यांचा थरार फुटबाँलप्रेमींना पहावयास मिळत आहे.