[ रत्नागिरी ]
संगमेश्वर तालुक्यातील साडवली कासारवाडी येथे संबंधाच्या संशयातून अनिकेत जाधव या तरूणाला जातीवाचक शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची घटना काही दिवसांपुर्वी घडली. या बेदम मारहाणीत तरुणाच्या गुप्तांगाला गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या अनिकेतला रत्नागिरी शहरातील खासगी रूग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया करून अधिक उपचारासाठी मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान जखमी तरूणाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. देवरूख पोलिसांनी मारहाण करणाऱ्या राजकुमार डोंगरे, शुभम धने, निखिल मोहिरे, श्रेयस मोहिरे (ऱा सर्व साडवली त़ा संगमेश्वर) या चौघांविरूद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आता या प्रकरणासंदर्भात वंचित बहुजन आघाडी संगमेश्वर तालुक्याचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसात आंबेडकरी समाजाकडून आक्रोश मोर्चा काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.
गावगुंडाचा दहशत माजवण्याचा प्रयत्न
यापूर्वी देखील राजकुमार डोंगरे, शुभम धने, निखिल मोहिरे, श्रेयस मोहिरे या गुन्हेगार प्रवृत्तीच्या गाव गुंडांनी अशाच पद्धतीने मारहाण केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. काही वर्षापूर्वी साडवलीतील एकनाथ मोहिते यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता, दुसरी घटना भारतीय बौद्ध महासभेचां बॅनर दगडी मारून फाडण्यात आला होता, त्यानंतर आरपीआयचे अध्यक्ष रजा मोहिते या व्यक्तीला देखील मारहाण केली होती. गेल्या तीन वर्षात संशयित आरोपीनी बौद्ध समाजाच्या व्यक्तींनाच टार्गेट करून हल्ले केल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपासून या गावगुंडाच्या हिटलिस्टवर अनिकेत जाधव होता. अनिकेत मित्राच्या घरी जात असताना त्याला रस्त्यात गाठून संशयित आरोपींनी अमानुष पद्धतीने मारहाण केली. त्याच्या पोटात व गुप्तांगावर बेदम मारहाण करीत मारून टाकण्याची ही धमकी दिली. या सर्व घटनेबाबत संपूर्ण देवरूख शहरात चौका-चौकात चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे.
दरम्यान वंचित बहुजन आघाडी तालुका संगमेश्वरच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आंबेडकरी समाजातील व्यक्तींवर होणारे घातक हल्ले रोखण्यासाठी काही कालावधी नंतर या गावगंडा विरोधात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. जेणेकरून बौद्ध व सर्व बहुजन समाजाकडे अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांची डोळे वर करण्याची हिम्मत देखील होणार नाही. यापुढे असे प्रकार घडल्यास वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून संगमेश्वरात आक्रमक भूमिका घेतल्या शिवाय राहणार नाही. तसेच या मारहाण प्रकरणाला विलंब करण्यासाठीं राजकिय पक्षाचा हस्तक्षेप असल्याचे निदर्शनास आल्यास पुढील काळात या पक्षांना देखील त्यांची जागा दाखवण्यात येईल, असा थेट इशारा वंचीत बहुजन आघाडीचे पदाधिकारी संतोष जाधव यांनी दिला आहे.
न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला; पोलिसांची भूमिका संशयास्पद
देवरूख पोलिसांनी संशयिताविरूद्ध भादंवि कलम 307, 325, 323, 143, 149, 504, 506 व अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 नुसार गुन्हे दाखल केले. संशयित आरोपींना शुक्रवारी (२१ एप्रिल २०२३) जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायालयाने संशयित आरोपींचां अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. मात्र सदर गुन्ह्यातील संशयित आरोपींची पार्श्वभूमी गुंड प्रवृत्तीची असल्याने त्यांच्यावर पोलिसांनीच अंकुश ठेवणे अपेक्षित होते. परंतु गुन्हा दाखल झाल्यानंतर ही संशयित आरोपी मोकाट आहेत. पोलीसांनी एकाही गावगुंडांना ताब्यात घेण्याचे कष्ट घेतले नाही. इतक्या गंभीर गुन्ह्यातील संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करणे गरजेचे होते. मात्र गावगुंडांना पोलिसांनी ताब्यात न घेताच मोकाट सोडले आहे. नेमके कोणाच्या आदेशाने पोलिसांनी आरोपींना मोकळे सोडलेय, असा संतप्त सवाल आंबेडकरी समाजाकडून विचारला जात आहे. तातडीने मोकाट असलेल्या या गुंडांना अटक करावी अन्यथा परिस्थिती चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच सर्व प्रकरणात पोलिस प्रशासनाची भूमिका संशयास्पद दिसून येत आहे.